राज्यात दोन कोटी झाडे जगविणार - रामदास कदम
By Admin | Updated: April 8, 2016 02:44 IST2016-04-08T02:44:05+5:302016-04-08T02:44:05+5:30
बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर वातावरणीय बदलांचा वेध घेण्यासाठी राज्यात स्वतंत्र वातावरण बदल कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम

राज्यात दोन कोटी झाडे जगविणार - रामदास कदम
मुंबई : बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर वातावरणीय बदलांचा वेध घेण्यासाठी राज्यात स्वतंत्र वातावरण बदल कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. तसेच आगामी काळात राज्यात दोन कोटी झाडे लावून ती जगविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पर्यावरणीय बदल आणि त्याच्या परिणामांबाबत भाजपाच्या शोभा फडणवीस यांनी अल्पकालीन चर्चेची मागणी केली होती. वातावरणातील बदलामुळे राज्यात पावसाचे प्रमाण कमी होत आहे. गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. हे मुद्दे त्यांनी उपस्थित केले होते. तर, शेकापचे जयंत पाटील म्हणाले की, जागतिक वातावरणात होत असलेल्या बदलाचा थेट परिणाम शेती आणि शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर होतो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे समाजाचा अन्नदाता शेतकरीच आज अन्नापासून वंचित होऊ लागला आहे. सदस्य राहुल नार्वेकर यांनीही याच भावना व्यक्त केल्या.
या वेळी मंत्री कदम म्हणाले, वातावरणातील बदलाची समस्या जागतिक आहे. झाडे तोडली जातात. पण झाडे लावण्याचे काहीच नियोजन होत नाही. वृक्षारोपण केले जाते. पण त्यापैकी किती झाडे जगतात याचे आॅडिट होत नाही तसेच महामार्गांसाठी हजारो झाडांची कत्तल होते, अशावेळी नवीन झाडे लावल्यानंतरच जुनी झाडे तोडण्याची परवानगी देण्याची गरज आहे. वातावरण नियंत्रित ठेवण्यासाठी वनांचे आच्छादन ३३ टक्क्यांपर्यंत असायला हवे. सध्या हे प्रमाण खूपच कमी आहे. ३३ टक्क्यांचे उद्धिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)