भुयारी रिंग रोडची योजना कागदावर येणार का?
By Admin | Updated: December 17, 2014 03:19 IST2014-12-17T03:19:10+5:302014-12-17T03:19:10+5:30
मुंबई-ठाणे शहर भुयारी मार्गाने जोडण्याचा मानस केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच मुंबईत बोलताना केला.

भुयारी रिंग रोडची योजना कागदावर येणार का?
गौरीशंकर घाळे, मुंबई
मुंबई-ठाणे शहर भुयारी मार्गाने जोडण्याचा मानस केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच मुंबईत बोलताना केला. ९० हजार कोटींच्या या योजनेच्या माध्यमातून मुंबईची वाहतूक समस्या सोडविण्याचा दावा त्यांनी केला. मात्र केंद्रीय मंत्री बनल्यानंतर घोषणांचा सपाटाच गडकरी यांनी लावल्याने भुयारी रिंग रोडची योजना किमान कागदावर तरी येणार का, अशी शंका निर्माण झाली आहे.
हॉलंड भेटीवर असताना ही कल्पना सुचल्याचे सांगतानाच या प्रकल्पामुळे वाहतूक समस्या सोडविण्यासोबत मुंबईचे सौंदर्य अबाधित राहणार असल्याचे गडकरींनी सांगितले. या योजनेचा खर्च ९० हजार कोटींहून ६० हजार कोटींवर आणण्याचाही प्रयत्न आपल्या विभागाच्या वतीने करण्यात येत असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. माहीमच्या खाडीपासून सुरू होणारा हा भुयारी मार्ग वांदे्र-वरळी सागरीसेतू आणि पुढे नरिमन पॉइंटपर्यंत जाईल. तर दुसरा टप्पा शिवडी ते न्हावाशेवा असा असेल.
सदर भुयारी मार्गासाठी निधीची अडचण नसल्याचे गडकरींनी सांगितले असले तरी हा निधी कसा उभारणार, याचे उत्तर मात्र त्यांनी दिले नाही. देशभरातील रस्त्यांसाठी दरवर्षी केवळ ३७ हजार कोटींचा निधी असताना मुंबईतील एका प्रकल्पावर ९० हजार कोटी कसा खर्चणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे. (प्रतिनिधी)