माझ्या आईपासून अधिकारी काही बोध घेतील का?
By Admin | Updated: December 10, 2014 00:41 IST2014-12-10T00:41:16+5:302014-12-10T00:41:16+5:30
माझी आई ग्रामसेविका होती, मग मुख्य सेविका झाली. तिच्या राज्यभरात अनेक ठिकाणी बदल्या झाल्या. त्या तिने निमूटपणे स्वीकारल्या. सगळीकडे सारखेच समरसून काम केले. आजचे अधिकारी बदल्या

माझ्या आईपासून अधिकारी काही बोध घेतील का?
निवृत्त आयएएस जोशींचा बदल्या टाळणाऱ्यांना सवाल
यदु जोशी - नागपूर
माझी आई ग्रामसेविका होती, मग मुख्य सेविका झाली. तिच्या राज्यभरात अनेक ठिकाणी बदल्या झाल्या. त्या तिने निमूटपणे स्वीकारल्या. सगळीकडे सारखेच समरसून काम केले. आजचे अधिकारी बदल्या टाळण्यावर भर देतात, याची खंत वाटते. आपल्या आईपासून कोणी याबाबत बोध घेईल का, असा आर्त सवाल माजी सनदी अधिकारी आणि राज्याचे माजी माहिती आयुक्त डॉ. सुरेश जोशी यांनी आज केला.
वर्षानुवर्षे मुंबई, ठाणे, पुण्यात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या गडचिरोली, गोंदियासह विदर्भात आणि मराठवाड्यात बदल्या करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली असल्याचे वृत्त लोकमतने आज दिल्यानंतर डॉ. जोशी यांनी लोकमतजवळ आपली भावना व्यक्त केली.
ते म्हणाले, माझी आई लीलाताई ग्रामसेविका झाली व नंतर १९५९ मध्ये मुख्य सेविका. केंद्रीय समाज कल्याण बोर्डाच्या अध्यक्ष तेव्हा दिग्गज नेते आणि अर्थतज्ज्ञ सी.डी. देशमुख यांच्या पत्नी दुर्गाबाई देशमुख होत्या.
माझी आई बदलीनिमित्त गावोगावी फिरली. चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, वर्धा आदी जिल्ह्यांमधील खेडी, आदिवासी गावे तिने अक्षरश: पालथी घातली आणि समाज कल्याण केंद्रांची स्थापना केली. पगार अर्थातच तुटपुंजा होता; पण ती कार्याने भारावलेली होती आणि त्यासाठी तिने कुटुंबाचे हितही बाजूला ठेवले, अशी आठवण डॉ. जोशी यांनी सांगितली.
अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी गेलेच पाहिजे. शासकीय नोकरीत बदल्या हा अविभाज्य भाग आहे आणि त्यात कोणीही टाळाटाळ करू नये, असा सल्लाही डॉ. जोशी यांनी दिला. सुरेश जोशी यांच्या आईच्या शेवटच्या तीन बदल्या झाल्या तेव्हा स्वत: जोशी हे आयएएस अधिकारी होते. ते १९७० चे आयएएस अधिकारी. त्यांच्या आई १९७९ मध्ये निवृत्त झाल्या. आपल्या आईची बदली त्यांना सहज रद्द करता आली असती.
पण तो विचारही आपल्या मनात तेव्हा आला नाही आणि आईने एक शब्दाने मला बदली रद्द करायला सांगितले नाही, हे सांगताना जोशी यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.