बाटल्या नाही रिचवणार...

By Admin | Updated: December 31, 2014 01:11 IST2014-12-31T01:11:12+5:302014-12-31T01:11:12+5:30

प्रत्येक अंत हा दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीचा आरंभ असतो. अशा अंत आणि आरंभाचा संधीक्षण असतो ३१ डिसेंबरची मध्यरात्र! जुन्या वर्षाला ‘बाय’ आणि नव्या वर्षाला ‘हाय’ करण्यासाठी

Will not rote bottles ... | बाटल्या नाही रिचवणार...

बाटल्या नाही रिचवणार...

‘न्यू ईअर’ : सामाजिक भावनेतून सेलिब्रेट करा
नागपूर : प्रत्येक अंत हा दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीचा आरंभ असतो. अशा अंत आणि आरंभाचा संधीक्षण असतो ३१ डिसेंबरची मध्यरात्र! जुन्या वर्षाला ‘बाय’ आणि नव्या वर्षाला ‘हाय’ करण्यासाठी युवाजगत अख्खी रात्रच जागून काढते. यंदाही ‘जागल्यां’चा जल्लोष उधाणणार आहेच. नागपुरातील ‘एन्जॉय स्पॉट’ आतापासूनच पार्ट्यांसाठी सज्ज होऊ लागले आहेत. युवक-युवतींचे प्लॅन्सही रेडी आहेत. आईबाबांची नजर चुकवून रात्री फिरताना पोलीसदादांनाही कसा चकमा द्यायचा, यासाठी नानातऱ्हेचे हतखंडे तरुणांनी तयार ठेवले आहेत. वाट आहे ती केवळ ३१ च्या रात्री पडणाऱ्या १२ च्या ठोक्याची! परंतु यंदा अनेक तरुणांनी मद्य प्राशन न करता नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा संकल्प केला आहे. ‘थर्टी फर्स्ट’चा आनंद तर साजरा करणार, पण विधायक पद्धतीने अशी अनेक तरुणांची भावना दिसून येत आहे.
‘न्यू ईअर सेलिब्रेशन’ म्हटले म्हणजे डोळ्यासमोर येते ती सळसळता उत्साह असलेली तरुणाई. ‘न्यू ईअर’चे समीकरण जुळलेलेच आहे ते पार्टी, मज्जा आणि मस्ती यांच्याशी. यामुळे युवकांनी केवळ धांगडधिंगा करायचा एक दिवस अशी यावर टीकादेखील होते. मात्र नवीन वर्षात पदार्पण करताना समाजातील उपेक्षितांकडे मैत्रीचा हात समोर करण्याचा संकल्प अनेक तरुण-तरुणींनी केला आहे.
शहरातील काही विद्यार्थ्यांनी मात्र हा दिवस समाजातील अशा लोकांसोबत साजरा करण्याचे ठरविले आहे. ज्यांना खरोखरच प्रेमाची नितांत आवश्यकता आहे, मायेचा ओलावा हवा आहे अशा बालक व वृद्धांसोबत ही मंडळी नवीन वर्षाचे स्वागत करणार आहेत.(प्रतिनिधी)
व्हॉटस्अ‍ॅपवर शुभेच्छांचा पाऊस
‘न्यू ईअर’च्या संपूर्ण दिवसाचा मोबाईल कंपन्यांकडून फायदा उचलल्या जातो. एका अर्थाने हा मोबाईलधारकांसाठी ब्लॅक डेच असतो. त्यामुळे अनेकांनी मंगळवारी दुपारपासूनच शुभेच्छांचे एसएमएस पाठवायला सुरुवात केली. बहुतांश लोकांनी तर ‘एसएमएस’च्या भानगडीत न पडता ‘व्हॉटस्अ‍ॅप’च्या माध्यमातूनच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणे सुरू केले आहे.
बाजारपेठांमध्ये उत्साह
‘न्यू ईअर’ साजरा करण्यासाठी बाजारपेठांमध्ये उत्साह दिसून येत आहे. हिवाळी परीक्षा जवळपास आटोपल्यामुळे अभ्यासाचे फारसे टेन्शन नाही. हॉटेल्स, पब्ज येथेदेखील विशेष तयारी करण्यात आली आहे. सदर, रामदासपेठ, लॉ कॉलेज चौक, सीताबर्डी, धरमपेठ, महाल व लक्ष्मीनगर या भागांतील गिफ्ट शॉपींमध्येदेखील युवक-युवतींची गर्दी दिसून येत आहे.

Web Title: Will not rote bottles ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.