राष्ट्रवादीसोबत जाणार नाही
By Admin | Updated: September 27, 2014 04:46 IST2014-09-27T04:46:57+5:302014-09-27T04:46:57+5:30
आम्ही कधीही राष्ट्रवादीसोबत नव्हतो, आताही नाही व पुढेही जाणार नाही, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले

राष्ट्रवादीसोबत जाणार नाही
नागपूर : आम्ही कधीही राष्ट्रवादीसोबत नव्हतो, आताही नाही व पुढेही जाणार नाही, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसची छुपी युती असल्याच्या काँग्रेस व शिवसेनेकडून होत असलेल्या आरोपांवर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केलेले घोटाळे भाजपानेच बाहेर काढले, असे सांगत टीकाकारांना जनताच उत्तर देईल, असा टोला त्यांनी लगावला.
फडणवीस यांच्यासह भाजपा उमेदवारांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी शिवसेनेवर थेट टीका करणे टाळले पण वेगवेगळी उदाहरणे देत युती तोडण्यासाठी शिवसेना कशी जबाबदार हे अप्रत्यक्षपणे सांगण्यासही ते विसरले नाहीत. फडणवीस म्हणाले, सिंचन घोटाळ्यासह राष्ट्रवादीचे इतर घोटाळे भाजपानेच उकरून काढले. विधानसभेत आम्ही संघर्ष केला. सभागृहाच्या कामकाजाचे जुने संदर्भ पाहिले तर मौन कुणी बाळगले होते, हे स्पष्ट होईल. काँग्रेसकडे आता आरोपांशिवाय काहिही राहिलेले नाही. भाजपाची राष्ट्रवादीशी कोणत्याही परिस्थितीत युती होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मनसेचे समर्थन घेण्यासही त्यांनी नकार दिला.
केंद्रात ज्या पक्षाचे सरकार असते त्याच पक्षाचे सरकार राज्यात आले तर राज्याचे अधिक भले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून भाजपाला मतदान करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुसऱ्या पक्षातील बरेच नेते भाजपामध्ये येण्यास उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार पक्षाचे संसदीय मंडळ ठरवेल, असे सांगत त्यांनी यासंदर्भातील प्रश्नाला बगल दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राजकीय नसतो असे सांगत परिवर्तन घडले पाहिजे असे जेव्हा स्वयंसेवकांना वाटते तेव्हा ते बाहेर पडतात, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)