भविष्यातील शक्यता खुल्या ठेवणार

By Admin | Updated: September 27, 2014 04:42 IST2014-09-27T04:42:42+5:302014-09-27T04:42:42+5:30

काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. १५ वर्षांनंतर संपूर्ण राज्यात थेट संघर्ष होत असल्यामुळे कार्यकर्ते जोशात आहेत, असे काँग्रेसच्या प्रवक्त्या शोभा ओझा यांनी स्पष्ट केले.

Will keep things open for the future | भविष्यातील शक्यता खुल्या ठेवणार

भविष्यातील शक्यता खुल्या ठेवणार

हेमंत कुलकर्णी , नाशिक
पाट लावून घ्यायचा, आयुष्यभरासाठी एकमेकाला बांधून घ्यायचं आणि एकदा जूनपण आलं, परस्परातलं स्वारस्य संपलं की, यानी तिचं आणि तिनं याचं लोढणं उगा वागवत बसायचं, यापेक्षा ‘लिव्ह इन रिलेशन’ बेस्ट! जोवर जमलं तोवर जमलं, अन्यथा फिसकटलं. निदान आजच्या पिढीचा तरी हाच मंत्र आणि देशाच्या थेट सर्वोच्च न्यायालयाचंही आता त्यावर शिक्कामोर्तब. मग युतीतले दोघे आणि आघाडीतलेही दोघे यांनी असाच काही विचार केला असेल तर तो कालसंगतच म्हणावा लागेल आणि पर्यायाने हे चारही पक्ष काळाबरोबर वागणारे आहेत, असे ताम्रपत्रही त्यांना बहाल करता येईल.
तसंही दोन्ही काँग्रेसची आघाडी होती किंवा सेना-भाजपाची युती होती म्हणजे नेमके काय होते? तेलात पाणी किंवा पाण्यात तेल अशीच त्यांची अवस्था होती. म्हटले तर आघाडीचे दोन्ही घटक आणि युतीतलहीे दोघे शिवरायांनाच आपले आराध्य दैवत मानणारे. म्हणजे खरे तरे या चार मावळ्यांचीच आघाडी किंवा युती व्हावयास हवी होती. पण तसे झाले नाही, होणे शक्यही नव्हते. कारण जे उपदेशायचे ते स्वत: आचरायचे मात्र कधीच नाही, हादेखील आजच्याच तथाकथित आधुनिक युगाचा धर्म आणि त्यावर चौघांचीही सारखीच श्रद्धा. परिणामी त्यांचं एकत्र येणं हा सोयीचा मामला होता आणि मग सोय जाणे तो सोयरा व न जाणे तो परका, हे ओघानेच आले.
सोयीसाठी म्हणजे व्यावहारिक भाषेत सत्तेसाठी त्यांचे एकत्र येणे होते. त्यामुळे त्यांनी आपापली अस्तित्वे तशीच जपून ठेवली होती. इतकेच नव्हे, तर आपल्या स्वतंत्र अस्तित्वाला अधिक टोकेरी, धारदार आणि व्यापक करण्याचे चौघांचे प्रयत्न सातत्याने सुरु होते व त्यासाठीच ‘शत प्रतिशत’ची जपमाळ ओढली जात होती.
याचा अर्थ स्पष्ट आहे. लढाई जरी अस्तित्वासाठी होती तरी ते अस्तित्व दुहेरी होते. एक सत्तेसाठीचे आणि दुसरे स्वत्वासाठीचे. त्यामुळे युतीच्या आणि आघाडीच्या अनुक्रमे पंचवीस आणि पंधरा वर्षांच्या सहचर्यात त्यांच्या भागीदारांनी परस्परांशी गोडीगुलाबीचे दैनंदिन संबंध प्रस्थापित केल्याचे कधीच आढळून आले नाही. निवडणुकांना भले आघाडी वा युती सामोरी गेली असेल पण त्या लढविल्या मात्र गेल्या, ज्याने त्याने आपल्याच एकट्याच्या बळावर. तसे होत असतानाही परस्परांच्या वाटेत काटे पेरणे वा प्रयत्नात बिबे घालणेही सुरुच होते, पण त्याचे फार मोठे प्रतिकूल परिणाम दिसून येत नव्हते. त्यामागील कारणमीमांसेचाच बहुधा आता सत्तेच्या मोहापायी साऱ्यांनाच विसर पडला असावा.
राजकीय पक्ष स्वत:ला कितीही ताकदवान समजत असले तरी ही ताकद मतदारांनी वा जनतेने आंदणात दिलेली असते. जोवर ती मिळत असते तोवरच तो पक्ष तुल्यबळ, समर्थ आणि शक्तीमान समजला जात असतो. हे समजणेच असते, वास्तवापासून बऱ्याचदा बरेचसे दूर! परिणामी ही ताकद सातत्याने मिळत रहावी आणि जमलेच तर ती वाढत जावी यासाठीच युती अथवा आघाडी असते. तिचा हेतू हाच मुळी आपल्या विचारांशी, भूमिकांशी आणि ध्येयधोरणांशी साधर्म्य राखून असलेल्या मतांची विभागणी होता कामा नये, असा असतो.
भाजपा-सेना युती जर धर्मान्धांची आणि आघाडी जर धर्मनिरपेक्षांची मानली तर या दोन विचारांशी ज्यांचे विचार जुळतात, त्यांच्या मतांचे विभाजन टळून वेगळ्या प्रकारचे ध्रुवीकरण व्हावे हा तर मुळी युती आणि आघाडी यांच्या मर्यादित अर्थाच्या का होईना सामिलीकरणाचा हेतु होता. युती वा आघाडी नेते वा कार्यकर्ते यांच्यासाठी कधी नव्हतीच मुळी! परंतु हे एकत्र येणे केवळ आपल्यासाठी आणि आपल्याकरिताच आहे, असा गंड दोहोकडील पक्षांनी मानला व त्याचीच परिणती फाटाफुटीत झाली, हे उघड आहे. अर्थात जे काही होते ते बऱ्याकरताच असे म्हणतात ते काही खोटे नाही. आजवर या चारही पक्षांची बंद मूठ सव्वालाखाची होती. ती आता येत्या काही दिवसात उघडेल आणि मग त्या साऱ्यांना आजवर आपण आपलेच जे प्रतिबिंब बघत होतो, ते वास्तव
होते की भ्रामक याचा उलगडा होऊन जाईल. त्यात महाराष्ट्राचे काय व्हायचे ते होईल कारण त्याची चिंता आहेच कुणाला?
एकदा का निवडणुका पार पडल्या आणि निकाल बाहेर आले की मग त्यातून आपला जोडीदार व तोही तात्पुरता निवडायचा आणि त्याच्या सोबतीने कालक्रमणा करायची, असाच काहीसा या साऱ्यांचा अर्थ निघतो, जो आजच्या ‘लिव्ह इन रिलेशन’शी पूर्णपणे साधर्म्य राखणारा ठरू शकतो.

Web Title: Will keep things open for the future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.