अपेक्षापूर्ती होईल का?
By Admin | Updated: July 10, 2014 00:58 IST2014-07-10T00:58:52+5:302014-07-10T00:58:52+5:30
अर्थव्यवस्थेचा विस्तार, उद्योगाला प्रोत्साहन, करवसुली वाढीचा पर्याय तसेच महागाईवर मात आणि कर सवलतींद्वारे सामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असावा. यंदाच्या अर्थसंकल्पाने अपेक्षांची पूर्ती होईल का,

अपेक्षापूर्ती होईल का?
अर्थसंकल्प : नागपूरकरांच्या अपेक्षा
नागपूर : अर्थव्यवस्थेचा विस्तार, उद्योगाला प्रोत्साहन, करवसुली वाढीचा पर्याय तसेच महागाईवर मात आणि कर सवलतींद्वारे सामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असावा. यंदाच्या अर्थसंकल्पाने अपेक्षांची पूर्ती होईल का, अशा नागपूरकरांच्या अपेक्षा आहेत.
वित्तमंत्री अरुण जेटली गुरुवार, १० जुलैला पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाद्वारे सरकारची पाच वर्षांची दिशा स्पष्ट होणार आहे. अर्थव्यवस्थेला चालना देणारा बजेट असावा, अशी तज्ज्ञांची अपेक्षा आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या महसुलाचा मोठा भाग कर्ज फेडण्यासाठी खर्च होतो. त्यामुळे अर्थव्यवस्था कर्जाच्या खाईत लोटली जाते. जीडीपीचे लक्ष्य गाठण्यासाठी आणि उत्तम अर्थव्यवस्थेसाठी कररचनेत सुलभता आणि करवसुलीत वाढ महत्त्वाची आहे. खर्च आणि महसूल वाढ यांच्यात संतुलन राखण्याचा वित्तमंत्र्यांनी प्रयत्न करावा. देशात सर्वाधिक रोजगार देणाऱ्या आणि अर्थव्यवस्था सक्षम करणाऱ्या लघु आणि मध्यम उद्योगांसाठी विशेष प्रोत्साहनपर योजना राबविण्याची उपराजधानीकरांना अपेक्षा आहे.
देशातील युवकांना स्वयंरोजगारासाठी राष्ट्रीयीकृत बँकांनी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याच्या घोषणा वित्तमंत्र्यांनी कराव्यात. उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवान्यासाठी एक खिडकी योजना सुरू करून प्रत्येक झोनमध्ये आयुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करावा. विदेशी कंपन्यांना देशात बोलविण्याऐवजी देशी कंपन्यांसाठी प्रोत्साहनपर योजनांची घोषणा करावी. बांधकाम क्षेत्रातील मरगळ दूर करण्यासाठी गृहकर्जाचे दर कमी करावेत.(प्रतिनिधी)