सिंचन घोटाळे करणा-यांच्या पाठिंब्यावर सरकार चालवणार का? उद्धव यांचा भाजपाला प्रश्न
By Admin | Updated: October 30, 2014 11:51 IST2014-10-30T09:52:01+5:302014-10-30T11:51:02+5:30
ज्या विदर्भात राष्ट्रवादीवाल्यांनी जलसिंचनाचे मोठे घोटाळे केले त्याच राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर फडणवीसांचे सरकार चालवले जाणार आहे काय असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला विचारला आहे.

सिंचन घोटाळे करणा-यांच्या पाठिंब्यावर सरकार चालवणार का? उद्धव यांचा भाजपाला प्रश्न
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - ज्या विदर्भात राष्ट्रवादीवाल्यांनी जलसिंचनाचे मोठे घोटाळे केले त्याच राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर फडणवीसांचे सरकार चालवले जाणार आहे काय असा सवाल उध्व ठाकरेंनी भाजपाला विचारला आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करतानाच सेनेने राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबद्दल नाराजी दर्शवत भाजपाला टोमणेही मारले आहेत.
अल्पमतातले सरकार आम्ही बनवू आणि चालवून दाखवू ही भूमिका सध्या ठीक आहे, पण असे सरकार चालवून सत्तेचा भोग घेणे घटनाविरोधी आहे असा टोला लेखातून लगावण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरून नाराजी व्यक्त करत सौभाग्यवतीप्रमाणे सरकारचे पावित्र्य महत्त्वाचे आहे. शरद पवार यांनी फडणवीस सरकारला न मागता पाठिंबा जाहीर केला. महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त व कॉंग्रेसमुक्त करण्याचे वचन देऊन आपण सत्तेवर आला असताना ज्यांनी विदर्भात जलसिंचन घोटाळा केला त्यांच्याच पाठिंब्यावर सरकार चालवणार का असा खडा सवाल अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. सत्ताकारण सतीसावित्रीचे नसले तरी अगदीच ऐर्यागैर्याच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राचे राज्य चालू नये असा इशाराही भाजपाला देण्यात आला आहे. भ्रष्ट काँग्रेस-राष्ट्रवादीला कायमचे गाडण्यासाठी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाले आहे, पण त्याच राष्ट्रवादीने पहिल्याच दिवशी पाठिंब्याचा खेळ करून दूध नासवण्याचा प्रयत्न केला. हे नासके दूध नव्या सरकारला बाळसे देणार असेल तर हा विषय फार न लांबवता इथेच पूर्णविराम दिलेला बरा असेही लेखात म्हटले आहे. मात्र राज्य स्थिर असावे व स्थिर राज्याचा मुख्यमंत्री स्थिर असावा, अशी अपेक्षा लेखात व्यक्त करण्यात आली आहे.
विदर्भाचा सुपुत्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होत असल्याचे सांगत लेखातून देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदनही करण्यात आले आहे. विदर्भाच्या मनातील मागासलेपणाची जळमटे दूर करण्याची जबाबदारी फडणवीस यांची आहे. विदर्भाचा सुपुत्र महाराष्ट्राने पोटाशी कवटाळला आहे व रायगडावरून त्याच्यावर पुष्पवृष्टी होत आहे. नव्या मुख्यमंत्र्यांनी हे सदैव स्मरणात ठेवावे असे सांगत महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे आम्ही मोकळ्या मनाने स्वागत करीत असल्याचेही लेखात नमूद करण्यात आले आहे.