बाबांचे स्वप्न पूर्ण करणार-पंकजा
By Admin | Updated: June 4, 2015 04:14 IST2015-06-04T04:14:37+5:302015-06-04T04:14:37+5:30
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी जनसामान्यांसाठी असंख्य स्वप्ने पाहिली. त्यांचा वारसा चालविणे सोपे नाही. मात्र, बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचे

बाबांचे स्वप्न पूर्ण करणार-पंकजा
परळी (जि. बीड) : दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी जनसामान्यांसाठी असंख्य स्वप्ने पाहिली. त्यांचा वारसा चालविणे सोपे नाही. मात्र, बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करणार असून त्यांचे नाव जगाला कधीच विसरु देणार नाही, असे भावनिक उद्गार ग्रामविकास व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी काढले.
भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त बुधवारी वैद्यनाथ कारखान्यावर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. बाबा गेल्यानंतर सर्वसामान्य जनतेने मला आधार दिला. त्यामुळे सामान्यांची जबाबदारी माझ्यावर आहे, असे त्या म्हणाल्या. भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री महाराज म्हणाले, मुंडे यांनी केलेले कार्य अविस्मरणीय असून इतिहासाला त्याची नोंद घ्यावी लागली आहे. त्यांचा वारसा कन्या पंकजा समर्थपणे पुढे नेत आहेत. प्रज्ञा मुंडे, खा डॉ. प्रीतम मुंडे, उद्योगमंत्री प्रकाश मेहता, गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे, आ. विनायक मेटे, आ. महादेव जानकर आदी उपस्थित होते.
मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी रांगा लागल्या होत्या. मुंडेंच्या आठवणींनी त्यांचे डोळे पाणावले होते. (प्रतिनिधी)