FTIIचा तिढा सुटणार? गजेंद्र चौहानांची होणार गच्छंती ?
By Admin | Updated: September 7, 2015 18:21 IST2015-09-07T10:28:15+5:302015-09-07T18:21:14+5:30
गजेंद्र चौहान यांना FTIIच्या अध्यक्षपदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून गेल्या ३ महिन्यांपासून सुरू असलेला हा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे.

FTIIचा तिढा सुटणार? गजेंद्र चौहानांची होणार गच्छंती ?
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली / पुणे, दि. ७ - एफटीआयआयच्या (फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) अध्यक्षपदावरून गजेंद्र चौहान यांना हटविण्याच्या हालचाली सुरू असून गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेला हा वाद अखेर संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, शेकडो विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर सरकार अखेर झुकले असून चौहान यांना हटवण्यात येणार असून त्यांच्या जाग प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांची अध्यक्षपदी नियुक्ती होऊ शकते.
एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला संस्थेतील विद्यार्थ्यांनी प्रचंड विरोध दर्शवला होता. चौहान यांची प्रतिमा व दूरदृष्टी संस्थेच्या अध्यक्षपदासाठी साजेशी नसून चौहान यांच्या निवडीद्वारे एफटीआयआयमध्ये राजकीय हस्तक्षेप करण्याचा सरकारचा डाव कधीच खपवून घेतला जाणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. या मागणीसाठी ते गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन करत असून अमोल पालेकर, ऋषी कपूर, नाना पाटेकर, रणबीर कपूरसह चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गजांनीही विदयार्थ्यांना पाठिंबा दर्शवला होता. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही एफटीआयआयमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना पाठिंबा दिला होता.
अखेर विद्यार्थ्यांच्या या लढ्याला यश मिळण्याची चिन्हं दिसत असून नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाल्याचे समजते. दरम्यान या निर्णयाबाबत अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.