वनरक्षक होणार ‘हायटेक’

By Admin | Updated: October 29, 2014 00:34 IST2014-10-29T00:26:27+5:302014-10-29T00:34:12+5:30

अत्याधुनिक शस्त्रासह अँन्ड्रॉईड मोबाईल फोनही मिळणार.

Wildlife will be 'hi-tech' | वनरक्षक होणार ‘हायटेक’

वनरक्षक होणार ‘हायटेक’

बुलडाणा : खाकी गणवेश आणि हातात काठी घेऊन जंगलाची सुरक्षा करणार्‍या वनरक्षकास हायटेक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार शिकारी आणि वृक्षतोड करणार्‍या टोळींचा ताकदीने सामना करण्यासाठी वनरक्षकाच्या हाती आता अत्याधुनिक शस्त्र आणि विशेष सॉफ्टवेअर असलेले अँन्ड्रॉईड फोन दिसू लागणार आहेत.
वनपरिक्षेत्रात एखादी शिकार, वृक्षतोड किंवा आगीसारखी घटना घडल्यास संबंधित वन कर्मचारी घटनेचा पंचनामा करून, गुन्हा दाखल करतो. त्यानंतर तो रिपोर्ट टपालाद्वारे मुख्यालयातील वरिष्ठांकडे पाठविला जातो; मात्र या प्रक्रियेस किमान एक आठवड्याचा कालावधी लागतो. यामुळे बरेचदा वरिष्ठांना योग्य कारवाई करण्यास विलंब होतो. या वेळखाऊ प्रक्रियेमुळे आरोपींचा गुन्हा सिद्ध करणे कठीण होते. आता वन कर्मचारी जंगलात कोणतीही घटना घडल्यास त्याबाबतचा रिपोर्ट नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने तत्काळ वरिष्ठांपर्यंत पोहोचवू शकणार आहे. याशिवाय अँन्ड्रॉईड मोबाईल फोनच्या माध्यमातून घटनेची छायाचित्रही वरिष्ठांकडे लगेच पाठविता येणार आहे. त्यामुळे वरिष्ठांना घटनेचे गांभीर्य समजण्यास मदत होईल. जंगलातील गैरकृत्यांवर आळा घालून, शिकार्‍यांवर वचक निर्माण करण्यास यामुळे मदत मिळेल. वनविभागाने प्रायोगिक तत्त्वावर पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नागपूर कार्यालयातील वन कर्मचार्‍यांना आधुनिक सॉफ्टवेअर असलेला अँन्ड्रॉईड मोबाईल फोन दिला आहे.

*पाच हजार वनरक्षकांना लाभ
पेंच व्याघ्र प्रकल्पानंतर अमरावती जिल्ह्यातील मेळघाट, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्यातील वनकर्मचार्‍यांना अत्याधुनिक शस्त्रासह अँन्ड्रॉईड मोबाईल फोन मिळणार असून, यासंदर्भात विभागीय स्तरावर प्रशिक्षणही दिले जात आहे. यात बुलडाण्याच्या अंबाबारवा अभयारण्याचाही समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा संपूर्ण राज्यभरात सुमारे ५ हजार वनरक्षकांना लाभ मिळणार आहे.

Web Title: Wildlife will be 'hi-tech'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.