'हायफाय' मेट्रो स्थानकांवर 'वायफाय'ची सोय
By Admin | Updated: July 4, 2014 09:33 IST2014-07-04T09:11:06+5:302014-07-04T09:33:55+5:30
हायफाय' मेट्रो स्थानकांवर 'वायफाय' सेवा उपलब्ध करण्यात आली असून १५ मिनिटांसाठी मोफत वायफाय सेवा असणार असून १८0 तासांसाठी १00 रुपये शुल्क आकारणी केली जाणार आहे.

'हायफाय' मेट्रो स्थानकांवर 'वायफाय'ची सोय
१५ मिनिटे मोफत वायफाय सुविधा : १८0 तासांसाठी १00 रुपये शुल्क
मुंबई : मुंबईकरांची वेळ वाचवणारी प्रवासी सेवा देणार्या मेट्रो प्रशासनाने वायफाय सुविधाही देण्याचा निर्णय सुरुवातीला घेतला होता. त्याची पूर्तता आता मेट्रो प्रशासनाकडून केली जात असून 'हायफाय' मेट्रो स्थानकांवर 'वायफाय' सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. १५ मिनिटांसाठी मोफत वायफाय सेवा असणार असून १८0 तासांसाठी १00 रुपये शुल्क आकारणी केली जाणार आहे.
८ जून रोजी घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत आली. ही सेवा सुरू होताच मुंबईकरांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. मेट्रो सुरू झाल्यापासून दररोज पाच लाख प्रवासी त्यामधून प्रवास करत आहेत. मेट्रो तसेच स्थानकांवर वायफाय नसल्याने नेट सर्फिंग, ट्विट आणि डाऊनलोडिंग प्रवाशांना करता येत नव्हती. त्यामुळे स्थानकांवर वायफाय देण्यात येईल, अशी घोषणाच सुरुवातीला केली होती. प्रवाशांची संख्या आणि त्यांना असणारी गरज पाहता अखेर मेट्रो प्रशासनाने वायफाय सेवा ३ जुलैपासून सुरू केली. मेट्रोच्या बारा स्थानकांवर ही सेवा उपलब्ध करण्यात आल्याचे मेट्रो प्रशासनाच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले. लॅपटॉप, टॅबलेट आणि स्मार्ट फोनवर हे वायफाय त्या वेळी उपलब्ध होईल. १५ मिनिटांसाठी वायफाय मोफत असेल. मात्र या वायफायचा फायदा प्रवाशांना स्थानकांवर कायमस्वरूपी पाहिजे असल्यास १00 रुपये कूपन्स घेऊन १८0 तास ही सुविधा मिळवू शकतात. हे कूपन विकत घेतल्यापासून सहा महिन्यांपर्यंत वैध असेल, असे या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
स्थानकात असताना वायफाय हवे असल्यास..
- प्रवाशांनी आपले इंटरनेट सुरू करावे.
- त्यानंतर wi-fi@mum metro असे टाइप करावे.
- मेट्रो प्रशासनाने वायफायसाठी youbroadband यांच्याशी टायअप केले असून त्यांची वायफाय सेवा उपलब्ध होईल.
मेट्रो प्रशासनाची चलाखी
- महत्त्वाची बाब म्हणजे वायफाय सुविधा ही मेट्रो रेल्वेत देण्यात आलेली नाही. तर ही सेवा स्थानकांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रोतून प्रवास करणार्या प्रवाशांना प्रत्यक्षात त्याचा काहीच फायदा होणार नाही. त्याचप्रमाणे १00 रुपये कूपन्सची ऑफर ही सुरुवातीला पाच हजार प्रवाशांसाठी वैध असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एकदा वायफायचे हे कूपन्स घेतल्यास ते प्रवाशांना परत मिळणार नसल्याचेही सांगण्यात आले.
* बुधवारी मेट्रोच्या एका डब्यातील एसीमध्ये तांत्रिक समस्या उद्भवल्याने त्यामधून मोठी गळती झाली होती. या डब्यातील तांत्रिक समस्या सोडवल्यानंतर ही ट्रेन पुन्हा प्रवाशांच्या सेवेत आणली गेली. मेट्रोकडे ६४ कोच असून प्रत्येक डब्यात दोन एसी युनिट आहेत. असे १२८ एसी युनिट गळतीच्या घटनेनंतर तपासणी करण्यात आल्याचे मेट्रो प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.