अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या

By Admin | Updated: August 17, 2015 00:52 IST2015-08-17T00:52:41+5:302015-08-17T00:52:41+5:30

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची कुऱ्हाडीने खांडोळी केल्याची खळबळजनक घटना वर्धेत शनिवारी सायंकाळी उघड झाली. तिचे शीर, हात व पाय कापून एका प्लास्टिकच्या

Wife's murder on suspicion of immoral relations | अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या

वर्धा : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची कुऱ्हाडीने खांडोळी केल्याची खळबळजनक घटना वर्धेत शनिवारी सायंकाळी उघड झाली. तिचे शीर, हात व पाय कापून एका प्लास्टिकच्या पोत्यात बाधून फेकले. कुत्र्यांनी या पोत्यातील मानवी अवयव बाहेर काढल्याने या हत्येला वाचा फुटली. या प्रकरणी पतीला अटक करण्यात आली असून त्याने हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
मंगला मोहन वरठी (३८) असे मृत महिलेचे नाव आहे. अंजनामाता परिसरात काही कुत्र्यांनी मानवी अवयव उचलून आणल्याचे येथील नागरिकांच्या नजरेत पडले. त्याची पाहणी केली असता तो मानवी पाय होता. याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. यावरून सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. पोलिसांचा शोध सुरू असताना काही अंतरावर आलोडी शिवारात महिलेचा पाय, हात व शीर आढळून आले. शीर प्लास्टिकच्या पिशवीत असल्याचे दिसून आले.
ही महिला कुठली याचा शोध सुरू असताना इंदिरानगर येथील मंगला वरठी नामक महिला शुक्रवारी रात्रीपासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याची माहिती तिच्या घरच्यांना देण्यात आली. यावरून तिचा मुलगा घटनास्थळी पोहोचला. महिलेच्या इतर शरीराचा शोध सुरू असताना कारला मार्गावर एका पोत्यात बांधून असलेला तिचे धड आढळले.
मंगलाच्या नातलगांनी तिची हत्या पती मोहन यानेच केल्याची तक्रार दाखल केली. यात त्यांनीही अनैतिक संबंधाचा उल्लेख केला होता. यावरून सेवाग्राम पोलीस ठाण्यात या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. तिच्या शरीराच्या काही अवयवाचा तपास पोलीस रविवारीही घेत होते. मोहन याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडे विचारणा असताना रविवारी सायंकाळी त्याने हत्येची कबुली दिली. त्याने शुक्रवारी रात्री मंगलाची हत्या केल्याचे सांगितले.
मोहन नेहमी बाहेर राहत असल्याने पत्नीचे कोणासोबत तरी अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याला आला. या कारणावरून या दोघांत वाद होत होता. त्यातूनच शुक्रवारी रात्री तिची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Wife's murder on suspicion of immoral relations