पतीला वाईट म्हणणारी पत्नी क्रूर

By Admin | Updated: June 27, 2016 04:54 IST2016-06-27T04:54:45+5:302016-06-27T04:54:45+5:30

खोटे आरोप करून पतीला वाईट ठरविण्याचा प्रयत्न करणारी पत्नी स्वत:च क्रूर ठरली.

Wife who says bad to husband is cruel | पतीला वाईट म्हणणारी पत्नी क्रूर

पतीला वाईट म्हणणारी पत्नी क्रूर

राकेश घानोडे,

नागपूर- खोटे आरोप करून पतीला वाईट ठरविण्याचा प्रयत्न करणारी पत्नी स्वत:च क्रूर ठरली. यामुळे त्यांचे विवाहसंबंध पुनर्स्थापित करण्याचा कुटुंब न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच रद्दबातल केला.
प्रकरणातील राहुल व कविता (काल्पनिक नावे) नागपूर येथील रहिवासी आहेत. २० आॅगस्ट २००२ रोजी त्यांचे लग्न झाले होते. दोघांचेही हे दुसरे लग्न होते. राहुल घटस्फोटीत होता, तर कविताच्या पहिल्या पतीचे निधन झाले आहे. राहुलला पहिल्या पत्नीपासून दोन मुले, तर कविताला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. लग्नाच्या काही महिन्यांनंतरच दोघांमध्ये खटके उडायला लागले. कविताला सोडून राहुल वेगळा राहायला लागला. अशी तीन वर्षे उलटल्यानंतर कविताने विवाहसंबंध पुनर्स्थापित करण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली. कुटुंब न्यायालयाने तिच्या बाजूने निर्णय दिला.
राहुलने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील केले. कविताने याचिकेत राहुलवर गंभीर आरोप केले होते. राहुल फारच वाईट स्वभावाचा व विकृत मनोवृत्तीचा माणूस असल्याचे चित्र त्यात रंगवले होते. असे असतानाही कविता त्याच्यासोबत राहण्यास इच्छुक आहे, ही बाब उच्च न्यायालयाला पटली नाही. कविताचे सर्व आरोप कोर्टाने बिनबुडाचे ठरविले. राहुल एवढा वाईट असता, तर सोबत राहण्याची कविताची इच्छाच नसती, असे मत न्यायालयाने नोंदवले आणि कुटुंब न्यायालयाचा निर्णय रद्द केला. (प्रतिनिधी)
>असे होते पतीवरील आरोप
पतीने केवळ मालमत्तेसाठी माझ्यासोबत लग्न केले. प्रत्येक चार वर्षांनी नवीन लग्न करण्याचा आपला व्यवसाय आहे, असे पती सांगत होता. पती माझ्या मुलींचा मानसिक छळ करीत होता. तो मुलींची हत्या करण्याची धमकी देत होता. मला व मुलींना उपाशी ठेवत होता. पतीने सिलिंडरचे रेग्युलेटर काढून ठेवले होते इत्यादी गंभीर आरोप पत्नीने केले होते.

Web Title: Wife who says bad to husband is cruel