पतीचा खून करून पत्नीवर बलात्कार

By Admin | Updated: March 5, 2016 03:43 IST2016-03-05T03:43:36+5:302016-03-05T03:43:36+5:30

पतीचा खून करून त्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याची घटना गुरुवारी रात्री अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात घडली. या प्रकरणी दोघांना शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली.

Wife raped by husband's murder | पतीचा खून करून पत्नीवर बलात्कार

पतीचा खून करून पत्नीवर बलात्कार

अलिबाग : पतीचा खून करून त्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याची घटना गुरुवारी रात्री अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात घडली. या प्रकरणी दोघांना शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, या दोघांनाही १० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हे पती-पत्नी रात्री झोपले असता, कोणीतरी अज्ञात व्यक्ती पत्नीबरोबर बळजबरी करीत असल्याचे पतीच्या लक्षात आले.

त्याने त्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी अज्ञात व्यक्तीने तेथून पळ काढला. पतीने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता, ती व्यक्ती आणि त्याचा मित्र या दोघांनी, पतीला पकडून पुन्हा घरात आणले. त्याला बांधण्याचा प्रयत्न करीत असतानाच्या झटापटीत त्यांनी पतीची मान जोरात दाबली त्यात पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या नराधमाने त्या महिलेवर बलात्कार केला आणि दोघेही पसार झाले.


पत्नीनेच मांडवा सागरी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. मांडवा सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक ए. एस. सोळसे यांनी दोघा आरोपींचा तत्काळ शोध सुरू केला. शुक्रवारी सकाळी १०च्या सुमारास मांडवा परिसरातच या दोघा नराधमांना अटक करण्यात आल्याचे रायगड येथील पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी पोलीस निरीक्षक अरविंद पाटील यांनी सांगितले. अधिक तपास  सहायक पोलीस निरीक्षक ए. एस. सोळसे करीत आहेत. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Wife raped by husband's murder