पत्नीचा खून करून पती पोलिसांच्या स्वाधीन
By Admin | Updated: November 3, 2014 03:53 IST2014-11-03T03:53:36+5:302014-11-03T03:53:36+5:30
सहा वर्षांपूर्वी लग्न झाल्यानंतर दोनच वर्षांत घटस्फोटासाठी न्यायालयात दावा दाखल करूनही एकत्र संसार करणाऱ्या रूपालीचा (२४) राजकुमार चव्हाण (२७) याने गळा आवळून खून केला.

पत्नीचा खून करून पती पोलिसांच्या स्वाधीन
ठाणे : सहा वर्षांपूर्वी लग्न झाल्यानंतर दोनच वर्षांत घटस्फोटासाठी न्यायालयात दावा दाखल करूनही एकत्र संसार करणाऱ्या रूपालीचा (२४) राजकुमार चव्हाण (२७) याने गळा आवळून खून केला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास आझादनगर भागात घडली. खून केल्यानंतर तो स्वत:च पोलिसांच्या स्वाधीन झाल्यानंतर त्याला अटक केल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली.
रूपाली आणि राजकुमार यांचा विवाह २००८ मध्ये झाला होता. त्यांना सहा वर्षांची सोनल ही मुलगीही आहे. दोघांमध्ये अनेकदा क्षुल्लक कारणावरून भांडणे होत होती. पती मारहाण तसेच शिवीगाळ करतो, अशी तक्रारही तिने कापूरबावडी पोलीस ठाण्यात २०१० मध्ये दाखल केली होती. त्यांनी २०१० मध्ये भिवंडी न्यायालयात घटस्फोटासाठी दावा दाखल केला होता. तो प्रलंबित आहे. मात्र, तरीही आपसात समझोता करून ते दोघेही एकत्र संसार करीत होते. रुग्णवाहिकेवर चालक असलेला राजकुमार शनिवारी रात्री उशिरा घरी परतला, तेव्हा त्याने पत्नीला जेवायला वाढण्यास सांगितले. तिने त्याला स्वत: घेण्यास सांगितल्यानंतर त्यांच्यात पराकोटीचा वाद झाला. त्यातूनच संतप्त झालेल्या पतीने हाताने तिचा गळा आवळला. रविवारी पहाटे १.३०च्या सुमारास तो पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलीस निरीक्षक कृष्णा काटकर यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. त्याला ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. (प्रतिनिधी)