सर्पोद्यानातील सर्पांचा मृत्यू नेमका कशामुळे?

By Admin | Updated: July 31, 2016 01:28 IST2016-07-31T01:28:14+5:302016-07-31T01:28:14+5:30

घराच्या आवारात साप दिसून आल्यास स्वत:च्या संरक्षणाच्या दृष्टीने ते मारले जातात.

Why snake deaths in snake charmers? | सर्पोद्यानातील सर्पांचा मृत्यू नेमका कशामुळे?

सर्पोद्यानातील सर्पांचा मृत्यू नेमका कशामुळे?


चिंचवड : घराच्या आवारात साप दिसून आल्यास स्वत:च्या संरक्षणाच्या दृष्टीने ते मारले जातात. साप मारले जाऊ नयेत, म्हणून सर्पमित्र अशा ठिकाणचे साप पकडून त्यांना सुस्थळी सोडून देतात. अशाच पद्धतीने जीवदान दिलेले साप संवर्धनासाठी सर्पमित्रांनी चिंचवड संभाजीनगर येथील बहिणाबाई चौधरी सर्पोद्यानात आणून दिले. तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ते सर्प मृत झाल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. विशेष म्हणजे सर्पोद्यानात मृत सापांचा खच पडल्याबद्दल तेथील अधिकारी, कर्मचारी अनभिज्ञ होते. कोणालाही या घटनेची खबर नव्हती.
घराच्या आवारात अथवा लोकवस्तीच्या भागात सर्प दिसून आल्यास त्यांना मारू नका, सर्पोद्यानास कळवा अथवा जवळच्या सर्पमित्रांना माहिती द्या, असे वारंवार आवाहन केले जाते. त्यानुसार नागरिकही आवाहनाला प्रतिसाद देतात. नागरिकांमध्ये त्याबद्दल चांगलीच जागृती झाली आहे. त्यामुळे कोणीही सापांना मारत नाही. साप दिसला की,लगेच सर्पमित्रांना कळविले जाते. घराच्या आवारातील साप सर्पमित्रांच्या मदतीने पकडले जातात. ते साप सर्पोद्यानात ठेवले जातात अथवा जवळच्या जंगलात निसर्गात सोडून दिले जातात, अशी नागरिकांची समज शनिवारच्या घटनेने फोल ठरली. सर्पमित्रांनी प्लॅस्टिक बरणी आणि प्लॅस्टिक पिशवीत साप आणले. त्या प्लॅस्टिक बरण्या, पिश्व्या खोलण्याची तसदीसुद्धा महापालिकेच्या सर्पोद्यानातील कर्मचाऱ्यांनी घेतली नाही. हवाबंद प्लॅस्टिक बरणीत, पिशवीत साप मृत झाले. ज्या ठिकाणी साप सुरक्षित राहतील, अशी अपेक्षा असते, त्या ठिकाणच्या गलथान कारभारामुळे साप मृत झाल्याचे उघडकीस आले आहे. घराच्या आवारात, सार्वजनिक वावर असलेल्या ठिकाणी सर्पमित्र साप पकडतात. नंतर ते साप सर्पोद्यानात अथवा जवळच्या जंगलात सोडून दिले जातात. (वार्ताहर)
>सात सापांचा मृत्यू
सर्पोद्यानात प्लॅस्टिक बरणी, पिशवीत, पोत्यात ठेवलेले सात साप मृत झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. मृत सापांमध्ये एक घोणस, एक नाग, एक गवत्या, दोन धामण, दोन चेकड अशा विविध जातीच्या विषारी, बिनविषारी सापांचा त्यामध्ये समावेश आहे. मृत अवस्थेतील साप सर्पोद्यानाच्या आवारात पडले होते. सर्पमित्रांनी आणून दिल्यानंतर पोती, पिशव्या खोलून पाहण्याची तसदीसुद्धा सर्पोद्यानातील कर्मचाऱ्यांनी घेतली नाही.
सर्पोद्यानात सर्पमित्रांना मार्गदर्शन
चिंचवड, संभाजीनगर येथील सर्पोद्यानात शनिवारी सर्पमित्रांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. वाघांची घटती संख्या याविषयी दुपारी दोन वाजल्यापासून सर्पमित्रांना मार्गदर्शन केले जात होते. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे यांच्यासह अन्य वक्त्यांनी सर्पमित्रांना त्याविषयी मार्गदर्शन केले. त्याचवेळी सर्पोद्यानात घडलेला हा प्रकार एका सजग नागरिकाने ‘लोकमत’च्या निदर्शनास आणून दिला.
>चुकीच्या पद्धतीने पकडताना सापाला इजा पोहोचवली जाते. सर्पोद्यानात साप दाखल घेण्यापूर्वी त्यांची योग्य प्रकारे तपासणी करावी लागते. सर्पोद्यानात दाखल केल्यानंतर त्याच्यावर आवश्यक ते उपचार करावे लागतात. प्रशिक्षित आणि सापांना हाताळण्याचे कौशल्य असलेले सर्पमित्रच योग्य प्रकारे साप पकडतात. सर्पोद्यानात आणलेले साप हे कंपनीच्या आवारात पकडले. ज्यांनी पकडले, त्यांनी इजा पोहोचवली असल्याने साप मृत झाले, असे वाटते. आपण बाहेर होतो. त्यामुळे नेमके काय घडले, हे सांगता येणार नाही.
- डॉ. सतीश गोरे, पशुवैद्यकीय अधिकारी पिं.चि.मनपा
विविध ठिकाणी पकडलेले साप अनेक जण सर्पोद्यानात आणून देतात. दंश झाल्यावर मारलेले साप अनेकदा नागरिक सर्पोद्यानात आणून देतात. त्यामुळे सर्पोद्यानात मृत झालेले सापसुद्धा दिसून येतात. घराच्या आवारात दिसलेला साप मारून तोसुद्धा सर्पोद्यानात आणला जातो. अशा प्रकारे आणलेल्या सापांची विल्हेवाट कशी लावायची, असा प्रश्न उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांपुढे निर्माण होतो. असे साप घेऊन येणाऱ्या कोणा कोणाची नोंद ठेवायची, असा मुद्दा उपस्थित होतो. सर्पोद्यानात आढळून आलेले मृत साप या घटनेत कोणीही कर्मचारी दोषी नाही.
- अनिल राऊत, कर्मचारी, सर्पोद्यान
>स्वयंघोषित सर्पमित्रांची संख्या अधिक
वनखात्याने सर्पमित्र म्हणून मान्यता दिलेल्या आणि ओळखपत्र दिलेल्या सर्पमित्रांपेक्षा स्वयंघोषित सर्पमित्रांची संख्या अधिक आहे. पिंपरी-चिंचवड व परिसरात अधिकृत सर्पमित्रांची संख्या ४३ आहे. परंतु, गल्लोगल्ली सर्पमित्र दिसून येतात.
सर्पोद्यानात झालेल्या कार्यक्रमास २३ सर्पमित्र उपस्थित होते. सर्पोद्यानात मृत सापांचा पडलेला खच पाहून त्यांचेही मन हेलावले. अनेक ठिकाणांहून आपण साप पकडून आणतो. ते सर्पोद्यानात आणून दिल्यानंतर त्याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे सर्पमित्रांनी जीवदान दिलेल्या सापांचा येथे बळी घेतला जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांच्यापैकीच एकाने हा प्रकार चव्हाट्यावर आणण्यास सहकार्य केले. वनखात्याच्या अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ते सांगतील त्या ठिकाणी पकडलेले साप सोडले जातात. अनेकदा वनखात्याच्या अधिकाऱ्यांकडून पंचनामाही केला जातो. महापालिकेचा कारभार मात्र मनमानी असल्याची खंत सर्पमित्रांनी व्यक्त केली.
>नागपंचमीला आठवड्याचा अवधी
दर वर्षी नागपंचमीनिमित्ताने सापाचे महत्त्व विशद केले जाते. नागपंचमीला विशेषत: नागाची पूजा केली जाते. नागपंचमीनिमित्ताने नागरिकांमध्ये सर्पांविषयी जागृती करण्यासाठी कार्यक़्रम घेतले जातात. सापाला मारू नका, असे आवाहन करणारेच महापालिकेच्या सर्पोद्यान विभागातील कर्मचारी निष्काळजीपणा दाखवून सापांचा जीव घेतात, ही बाब निदर्शनास आली आहे.

Web Title: Why snake deaths in snake charmers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.