केंद्रात मंत्री असताना आयकरचा प्रश्न का सोडवला नाही?
By Admin | Updated: January 30, 2015 04:10 IST2015-01-30T04:10:43+5:302015-01-30T04:10:43+5:30
मागील १० वर्षांत एसएमपी आणि एफआरपीपेक्षा जास्त दर देणाऱ्या साखर कारखान्यांना आयकर भरण्याबाबत आयकर विभागाने नोटीस पाठवली

केंद्रात मंत्री असताना आयकरचा प्रश्न का सोडवला नाही?
पुणे : मागील १० वर्षांत एसएमपी आणि एफआरपीपेक्षा जास्त दर देणा-या साखर कारखान्यांना आयकर भरण्याबाबत आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आता याबाबत बोलत आहेत. पण स्वत: १० वर्षे मंत्री असताना त्यांनी हा प्रश्न का सोडवला नाही, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी उपस्थित केला.
शेट्टी म्हणाले, ‘‘मागील १० वर्षांत पवार यांच्या कृषी मंत्रालयाच्या अखत्यारीतील कृषीमूल्य आयोगाने शेतकऱ्याचे उत्पादनमूल्य कमी गृहीत धरून एसएमपी व एफआरपी ठरवली. आधीच दर व्यवस्थित ठरवला असता तर आयकर विभागाचे नोटीस प्रकरण घडलेच नसते.’’
एफआरपीच्या मुद्द्यावर पवार यांनी कारखानदारांची बाजू घेतल्याच्या मुद्द्यावर शेट्टी म्हणाले, ‘‘पवार यांनी कारखानदारांऐवजी शेतकऱ्यांची बाजू घेऊन त्यांना वेळेत पैसे देण्यास बजावायला हवे होते.’’ एफआरपीच्या आंदोलनाची दिशा ३१ जानेवारीनंतर ठरवू, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)