भयमुक्तीचा नारा का नाही?
By Admin | Updated: January 4, 2016 03:18 IST2016-01-04T03:18:11+5:302016-01-04T03:18:11+5:30
कॉँग्रेसमुक्त भारत, स्वच्छ भारत घोषणा दिल्या जातात, पण भयमुक्त भारत का नाही, असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक अशोक वाजपेयी यांनी रविवारी उपस्थित केला.

भयमुक्तीचा नारा का नाही?
पुणे : कॉँग्रेसमुक्त भारत, स्वच्छ भारत घोषणा दिल्या जातात, पण भयमुक्त भारत का नाही, असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक अशोक वाजपेयी यांनी रविवारी उपस्थित केला. कला, संस्कृतीच्या संवर्धनासाठी संस्थात्मक काम व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कलाछाया संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, कवी संजय विसपुते, नचिकेत पटवर्धन, मीना चंदावरकर उपस्थित होते. असिहिष्णुतेचा मुद्दा उपस्थित करून वाजपेयी यांनी साहित्य अकामदीचा पुरस्कार सर्वप्रथम परत केला. त्यानंतर ते पहिल्यांदाच पुण्यात आले होते.
वाजपेयी म्हणाले, राजकीय, आर्थिक मुद्द्यांचा कलांवर परिणाम होतो. कलांना, अभिव्यक्तीला विरोध हा ५० वर्षांपासून चालत आलेलाच आहे. पण याकडे साहित्य क्षेत्राचे लक्षच गेलेले नाही. पुरस्कार परत केला तेव्हा या गोष्टीकडे संपूर्ण देशाचे लक्ष गेले. प्रांताप्रांताप्रमाणे कलाव्यवहार वेगवेगळे आहेत. त्याला नावे ठेवणारे वेगवेगळे आहेत. अनुचित प्रकारांवर लेखक, साहित्यिकांनी भाष्य करावे,अशी समाजाची अपेक्षा असते, पण त्याबाबत समाजाचीही काही जबाबदारी आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सांस्कृतिक बाबींच्या संवर्धनासाठी काही संस्था पुढे आल्या, काही लोप पावल्या. काही संस्थांचे कार्य अद्यापही सुरू असल्याचे सांगून वाजपेयी म्हणाले, सर्वसामान्य समाज आणि अभिजात समाज अशी एक वर्गवारी केली जाते. ज्यांचा संस्कृती, कलांशी काही संबंध नाही अशा व्यक्ती मंत्रालयात अधिकारीपदावर आहेत. कलांविषयी त्यांना काही प्रश्न विचारला ते चुकीचे उत्तर बेधडकपणे देतात.
रसिकांना जसे स्वातंत्र्य आहे तसेच कलाकारांनाही आहे. रसिकांसमोर ज्या गोष्टी येतात त्याचाच ते विचार करतात, अशी टिप्पणी त्यांनी केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरुन तणाव नसावा, असेही ते म्हणाले. कला, राजकीय क्षेत्रात पवित्र कुणीच उरले नाही, राजकारणात सर्वच वाईट आहेत असेही नाही, असे डॉ. आगाशे म्हणाले. (प्रतिनिधी)दिल्लीत ३० जानेवारीला सत्याग्रह
देशात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण केले जात आहे. याविरोधात
३० जानेवारी रोजी दिल्लीत सत्याग्रह करण्यात येणार असल्याचे अशोक वाजपेयी यांनी या वेळी सांगितले.