ग्राहकांची लूट कशासाठी ?
By Admin | Updated: August 27, 2014 01:00 IST2014-08-27T01:00:53+5:302014-08-27T01:00:53+5:30
बेमुदत बंद आंदोलन सायंकाळी मागे घेतल्याची माहिती पेट्रोल पंपचालकांनी ग्राहकांपासून लपविली. सर्वच पंपचालकांनी ग्राहकांना रात्री १२ वाजेपर्यंत पेट्रोल विकून त्यांची शुद्ध फसवणूक केल्याची

ग्राहकांची लूट कशासाठी ?
पंपचालकांचे बंद आंदोलन : संप मागे घेतल्याची माहिती लपविली
मोरेश्वर मानापुरे -नागपूर
बेमुदत बंद आंदोलन सायंकाळी मागे घेतल्याची माहिती पेट्रोल पंपचालकांनी ग्राहकांपासून लपविली. सर्वच पंपचालकांनी ग्राहकांना रात्री १२ वाजेपर्यंत पेट्रोल विकून त्यांची शुद्ध फसवणूक केल्याची बाब पुढे आली आहे. बंद मागे घेतल्याचा फलक लावण्याची तसदी कोणत्याही पंपचालकाने घेतली नाही.
कुठलीही मागणी मान्य करण्याचे अधिकार सरकार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना आहे. एलबीटी रद्द करण्याची भूमिका भाजपाने यापूर्वीच जाहीर केली आहे. अशावेळी त्यांच्या पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा करून संप मागे घेण्याची घोषणा हीसुद्धा शुद्ध फसवणूक ठरते. वास्तविक संपाबाबत वाटाघाटी सरकारी पक्षासोबत केल्या जातात. कारण निर्णय घेणारी यंत्रणा सरकारी असते, हे येथे उल्लेखनीय. बंदच्या सर्वच घडामोडी संशयास्पद असल्याने पुढच्या काळात पेट्रोलचे दर कमी होण्याची शक्यता गृहित धरून, आहे तो साठा वाढीव दराने जलद गतीने संपविण्याचा घाट संपाच्या निमित्ताने घालण्यात आला होता, हे आता स्पष्ट झाले आहे. ग्राहकांना वेठीस धरून जास्त नफा कमविण्याच्या वृत्तीला आळा घालण्यासाठी सरकारने पंपचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विविध ग्राहकांनी संघटनांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.
बंद मागे घेतल्याचा फलक नसल्याने रांगा
बंद मागे घेण्याचा निर्णय सायंकाळी ६.३० वाजता फेडरेशन आॅफ आॅल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनने घेतला. त्याची माहिती ७ वाजेपर्यंत राज्यातील या असोसिएशनशी संलग्न सर्वच पंपचालकांना देण्यात आली. बंदच्या भीतीने वाहनचालकांनी वाजवीपेक्षा पाचपट पेट्रोल भरले. सकाळी १० ते रात्री १२ वाजेपर्यंत सर्वच पंपांवर लांबच लांब रांगा होत्या. अनेक पंपांवर पेट्रोल संपल्याच्या पाट्या झळकत होत्या. पण संप मागे घेतल्यानंतर कोणत्याही पंपचालकाने संप मागे घेतल्याची पाटी लावली नाही. कदाचित ही पाटी वाचून ग्राहक रांगेतून घराकडे परतले असते. बंद मागे घेतल्याची साधी कल्पनाही ग्राहकांना नसल्याने अनेकांनी १२ वाजेपर्यंत रांगेत उभे राहून पेट्रोल भरले.
सकाळी १० वाजेपासून रांगा
पंप बेमुदत बंद होण्याच्या भीतीपोटी अनेकांनी कार्यालयात जाण्याआधी आणि नंतर पंपावर रांग लावली. तरुणांपासून वयस्कांपर्यंत सर्वजण रांगेत तासन्तास पेट्रोल खरेदीसाठी उभे होते. पेट्रोलविना कुठेही जाणे शक्य नसल्याच्या मानसिकतेत अनेकांनी तिप्पट, पाचपट पेट्रोल भरले. आठवड्याभर होणारी पेट्रोलची विक्री एकाच दिवसात करून पंपचालकांनी अतिरिक्त नफा कमविल्याचा आरोप विविध ग्राहक संघटनांनी केला आहे.
व्हॅट व एलबीटी
खरंच हटविणार का?
युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर पेट्रोलवरील व्हॅट आणि एलबीटी हटविण्याचे आश्वासन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सोमवारी सायंकाळी मुंबईत पत्रपरिषदेत दिले. तावडेंची घोषणा आणि असोसिएशनचा बंद मागे घेण्याचा निर्णय, हे सर्व नियोजित असल्याचा आरोप ग्राहक संघटनांनी केला आहे. बेमुदत बंदची घोषणा करून तारखेपूर्वीच बंद मागे घेण्याच्या घटना एवढ्यात दोनदा घडल्या आहेत. पुढेही घडू शकतात. बंद आंदोलनावर किती विश्वास ठेवावा, हे आता ग्राहकांनीच ठरवावे, असे संघटनांनी म्हटले आहे.
पेट्रोलची विक्री वाढविण्यासाठी बंदचे आवाहन
पेट्रोल आणि डिझेलच्या अधिकाधिक विक्रीसाठी असोसिएशनने बंदचे आवाहन केले होते. आठवडाभर होईल एवढी विक्री एकाच दिवशी झाली. पंपचालकांना हेच हवे होते. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहे. आॅगस्ट महिन्यात पेट्रोलचे दर प्रति लिटर तब्बल साडेतीन रुपयांनी कमी झाल्याचा फटका पंपचालकांना याआधी बसला. जवळील साठा विकल्यानंतर कमी दरातील पेट्रोल खरेदीसाठी तयार राहू, असे नियोजन करून पंपचालकांनी संप केला. बंदचे आवाहन एलबीटी आणि व्हॅट कमी करण्यासाठी असेल तर, असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाशी चर्चा करावी. पंपचालकांनी केव्हाही बंद आंदोलनाचे हत्यार उगारून आपल्या फायद्यासाठी ग्राहकांना वेठीस धरू नये.
-देवेंद्र तिवारी, महासचिव, अ.भा. ग्राहक कल्याण परिषद
ग्राहकांना वेठीस धरणे अयोग्य
ग्राहकांना वेठीस धरून करण्यात येणारे कोणत्याही आंदोलनाचे समर्थन अ.भा. ग्राहक पंचायत करूच शकत नाही. व्हॅट आणि एलबीटीमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत, ही बाब सर्वांना माहीत आहे. ते कमी करण्यासाठी आपली मागणी सरकारपुढे रेटून नेण्याची गरज आहे. व्हॅट आणि एलबीटी हटवा आणि दर आताच कमी करा, असे सांगून हे आंदोलन ग्राहकांसाठी पुकारल्याचा असोसिएशनचा कांगावा होता. गेल्यावर्षीही बंद आंदोलनाची घोषणा केली होती. तेव्हाही आंदोलन झालेच नाही. यावेळीसुद्धा तेच घडले. पेट्रोल आणि डिझेलचा जवळील साठा दिवसभर विकून झाल्यानंतर सायंकाळी बंद मागे घेतला. २५ तारखेला शुद्ध पेट्रोल की भेसळयुक्त पेट्रोल विकले, याची शहानिशा कोणत्याही अधिकाऱ्याने केली नाही. बंदच्या मार्गाने ग्राहकांना वेठीस धरून लुटण्याचा फंडा पंपचालकांनी बंद करावा.
-गजानन पांडे, अध्यक्ष, विदर्भ प्रांत, अखिल भारतीय ग्राहक पंचायत