राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. किरण सामंत बंधूंनी साळवींच्या पक्ष प्रवेशाला विरोध केला होता. किरण सामंत यांनी यावेळी साळवींना पराभूत केले होते. यामुळे साळवी भाजपात जातील असे बोलले जात होते. परंतू, अखेर साळवींनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. यावर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मोठा संशय व्यक्त केला आहे.
राजन साळवी नेहमी "मी एकमेव निष्ठावान" म्हणायचे. स्वतःच स्वतःला एखादी बिरुदावली लावतो, सुरुवातीला लोकांना अप्रूप वाटते. नंतर विषय चेष्टेचा होतो. आता निष्ठावान ही बिरुदावली तुम्हाला लावावी का? हे राजन साळवींना विचारा, असे जाधव म्हणाले. तसेच राजन साळवी यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश का झाला नाही? तिथे विरोध कोणी केला? असा सवालही त्यांनी केला.
आता सामंत बंधूनी त्यांचे स्वागत केले असेल तर मला माहित नाही. पण आता हे स्वागत आहे की, त्यांना कबड्डी कबड्डी करून आत घेऊन त्यांना आपटायची तयारी आहे? हे येत्या काळात दिसेल, असा टोलाही त्यांनी लगावला. उद्धव ठाकरेंचे लोक फोडणे म्हणजे ऑपरेशन टायगर आहे. आजही एकच टायगर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे विरोधकांना मान्य करावे लागतेय, याचा मला अभिमान आहे , असे जाधव म्हणाले.
तसेच जाणाऱ्यांनी आणि येणाऱ्यांनी आपण जाण्याची आणि येण्याची वेळ आपल्या दृष्टीने योग्य आहे का? याचा विचार करून आहेच त्याच ठिकाणी थांबणे योग्य आहे, असा सल्लाही त्यांनी पक्षातील लोकांना दिला आहे. उद्धव ठाकरे यांना त्रास द्यायचाच हा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. जे जात आहेत त्यांना थांबविण्यासाठी पक्षप्रमुख प्रयत्न करत आहेत. काही लोकांना वेगवेगळ्या मार्गाने आपल्याकडे वळविले जात आहे. एवढे होऊनही उद्धव ठाकरे खचले नाहीत, हात टेकले नाहीत. यामुळे झोप उडाली आहे, अभी भी टायगर जिंदा है, ही भीती त्यांच्या मनात आहे. जाणाऱ्यांना जाऊदे असे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी म्हणणे योग्य आहे, आमच्यासारख्या नेत्यांनी ही भाषा वापरणे योग्य नाही. जाणाऱ्यांना मागे कसे फिरवता येईल हे पाहिले पाहिजे. जातील त्यांना जाऊ द्या, असं म्हणणं लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही, असेही जाधव यांनी म्हटले.