उमेदवारी घेता का उमेदवारी?

By Admin | Updated: September 27, 2014 04:52 IST2014-09-27T04:52:40+5:302014-09-27T04:52:40+5:30

उमेदवारी घेता का उमेदवारी... अशी हाळी देत राजकीय पक्ष सध्या उमेदवारांच्या शोधात वणवण फिरतानाचे चित्र राज्यभर निर्माण झाले आहे

Why the candidature of the candidate? | उमेदवारी घेता का उमेदवारी?

उमेदवारी घेता का उमेदवारी?

अतुल कुलकर्णी, मुंबई
उमेदवारी घेता का उमेदवारी... अशी हाळी देत राजकीय पक्ष सध्या उमेदवारांच्या शोधात वणवण फिरतानाचे चित्र राज्यभर निर्माण झाले आहे. दोन दिवसापूर्वी सुरक्षीत मतदार संघाच्या शोधात उमेदवार फिरत होते आणि उमेदवाऱ्या देणारे नेते मात्र जागाच शिल्लक नाही, तर कोठून देणार असा सूर लावून होते. मात्र घटस्थापनेच्याच दिवशी दोन मोठे घटस्फोट झाले आणि हेच चित्र नव्वद डिग्रीने उलटे होऊन गेले.
राष्ट्रवादीच्या नेत्याने एका पदाधिकाऱ्याला फोन केला. उद्या तुम्हाला अमूक अमूक मतदार संघातून उमेदवारी भरायची आहे, तयारी करा... असे त्यांना सांगण्यात आले. स्वप्नातही कधी आपल्याला विधानसभेची उमेदवारी पक्ष देईल याची सुतराम कल्पना नसलेल्या त्या पदाधिकाऱ्याला घेरीच येणे बाकी होते. त्याला जो मतदारसंघ सांगण्यात आला तेथे गेल्या पंधरा वर्षात पक्षाचे कसलेली कामच नाही, मी कसा उभा राहू असे तो म्हणत असतानाच फोन कटही झाला...
दुसरा एक प्रसंग अशाच एका मतदारसंघातला. तो मतदारसंघ आधी भाजपाकडे होता. घटस्फोटानंतर तो मतदारसंघ खुला झाला. सेनेने त्यावर उमेदवार दिला. पण दुसऱ्या एका पक्षाने तो स्वत:साठी मागितला. सेनेने थोडेसे ताणून धरले. आमच्याकडे उमेदवार आहे, आम्ही लढवणार आहोत असे सांगीतले. दोघांमध्ये बराचवेळ चर्चा झाली. शेवटी तुमचा उमेदवार कोण आहे? असे सेनेच्या नेत्याने विचारले त्यावर आपण दोघेही एकाच उमेदवारासाठी एवढी चर्चा करतोय हे त्यांच्या लक्षात आले...
सेनेचे एक माजी आमदार भाजपाच्या कार्यालयात गेले. त्यांचे चहापानाने स्वागत झाले आणि दहा मिनीटाच्या चर्चेनंतर त्यांनी उमेदवारी मिळाल्याचे आपल्या मतदारसंघात फोन करुन सांगूनही टाकले...
काँग्रेसच्या एका नेत्याने फोन करुन तुम्हाला उमेदवारी दिलीय... फॉर्म भरण्याची तयारी करा असे सांगितले त्यावर तो उमेदवार म्हणाला, साहेब, मतदार यादी सुध्दा नाही माझ्याकडे. कार्यकर्ते कोठून आणू, काहीच तयारी नाही, फॉर्म भरण्यासाठीची तांत्रिक तयारी देखील केलेली नाही...
भाजपा-सेना आणि दोन्ही काँग्रेसकडे असलेल्या मतदारसंघात सहयोगी पक्षाला पक्ष वाढविण्याची कसलीही संधीच कधी मिळाली नाही. मोठ्या शहरांमध्ये थोड्याफार प्रमाणात अन्य पक्षांनी
हातपाय पसरले मात्र बाकी ठिकाणी ही संधीच फारशी मिळू शकली नाही. त्यामुळे अनेक मतदारसंघात उमेदवार आणि कार्यकर्ते शोधण्यापासूनची तयारी सुरु झाली आहे.

Web Title: Why the candidature of the candidate?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.