विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात अलीकडे बरीच प्रकरणे समोर आली तेव्हा ‘सन्माननीय’ अंजली दमानिया काहीही बोलल्या नाहीत, तेव्हा त्यांची दातखिळी का बसते? फक्त मलाच का टार्गेट केले जाते, असे सवाल माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित केले. माझ्यावरील आरोपांचा बोलविता धनी कोण आहे याचा मी शोध घेतोय, असेही ते म्हणाले.सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसेंविरुद्ध विनयभंगाचा आरोप करत तशी तक्रार दाखल केली. त्यानंतर खडसे यांनी पत्रपरिषद घेऊन आरोपांचे खंडण केले. ते म्हणाले, काही जणांना माझ्यावर आरोप करण्यात आनंद वाटतो. अजित पवार, सुनील तटकरे यांच्याविरुद्धही दमानिया यांनी आरोप केले होते. मग या प्रकरणात माघार का घेतली? चाळीस वर्षांच्या राजकारणात मी एक पैशाचीही अवैध संपत्ती जमविली असल्याचे त्यांनी सिद्ध केले तर ती संपत्ती आपण त्र्यंबकेश्वरच्या ब्राह्मणांना दान देऊ, असे आव्हान खडसे यांनी दिले.माझे शेतीपासूनचे उत्पन्न वाढले. आंब्याची झाडे, त्यांचा आकार वाढला. तसेच दमानियांच्या शेतातील उत्पन्नही वाढले असेल, असे मी बोललो. यात एक महिला म्हणून त्यांना हिणवण्याचा वा त्यांच्याविषयी अश्लील बोलण्याचा माझा हेतू नव्हता. दमानिया माझ्यावर आरोप करीत आहेत, कारण माझ्या महसूल मंत्रीपदाच्या काळात त्यांची शेतजमीन सरकारजमा करण्यात आली होती त्याचा राग असावा, असेही खडसे म्हणाले.दमानिया यांनी आपल्यावर आधीही आरोप केले; पण एकही त्या सिद्ध करू शकलेल्या नाहीत. आपल्यावर एकतरी आरोप सिद्ध करून दाखवा, असे आव्हान देत नाथाभाऊंचा भुजबळ करावा, असे कुणाला वाटत असेल तर ते त्यांचे स्वप्नरंजनच ठरेल, असा दावाही खडसे यांनी केला.
फक्त मलाच का टार्गेट केले जाते? खडसेंचा सवाल, बोलविता धनी कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 03:42 IST