आडवाणींना आणीबाणीची भीती का वाटते - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: June 22, 2015 09:39 IST2015-06-22T09:00:34+5:302015-06-22T09:39:42+5:30
लालकृष्ण आडवाणी यांनी व्यक्त केलेली आणीबाणीची भीती सहज नसून ते 'कुणावर तरी' निशाणा साधत असल्याचे सांगत आडवाणी यांना आणीबाणीची भीती का वाटते असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

आडवाणींना आणीबाणीची भीती का वाटते - उद्धव ठाकरे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - देशाच्या राजकारणातील सर्वात ज्येष्ठ नेते असलेल्या लालकृष्ण आडवाणी यांनी व्यक्त केलेली आणीबाणीची भीती सहज नसून ते 'कुणावर तरी' निशाणा साधत असल्याचे सांगत आडवाणी यांना आणीबाणीची भीती का वाटते असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. भाजपांतर्गत घडामोडींविषयी आडवाणींना जर काही सुचवायचे असेल तर त्यांनी स्पष्ट पणे बोलायला हवे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
तसेच आडवाणींसारख्या नेत्यांनीच आणीबाणीची भीती व्यक्त केल्याने त्याकडे साफ दुर्लक्षही करून चालणार नाही असा इशाराही त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून दिला आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात :
आडवाणींनी राजकारणात मोठा संघर्ष केला आहे. ते अनेक चढ-उतारांना सामोरे गेले आहेत. आज भाजपच्या राजकारणात ते थोडे बाजूला पडले असले तरी या तपस्वी राजकारण्यास दुर्लक्षित करून चालणार नाही हे भाजपमधील व प्रसारमाध्यमांतील मोठ्या गटास वाटते. आडवाणी यांना भाजपअंतर्गत घडामोडींविषयी काही सुचवायचे असेल तर त्यांनी स्पष्टपणे बोलायला हवे. कारण पक्षात कितीही घुसमट झाली तरी मधल्या काळात मुरली मनोहर जोशी, कीर्ती आझाद अशा नेत्यांनी आपली मते परखडपणे मांडली आहेत. त्यामुळे आडवाणी यांना आणीबाणीची भीती का वाटते, हे कोडेच आहे
भारतात आणीबाणीला(इमर्जन्सी) ४० वर्ष होऊन गेली असली तरी देशात पुन्हा आणीबाणी लागू होऊ शकते. सध्या संविधान व कायद्याचे कवच असूनही लोकशाहीला चिरडणे सहज शक्य असल्याची भीती लालकृष्ण आडवाणी यांनी व्यक्त काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. केंद्रात मोदी सरकार सत्तेवर असतानाच आडवाणींनी हे विधान करुन मोदींवर निशाणा साधल्याची चर्चा रंगली होती. त्याच पार्श्वभूमीवर सामनातूनही भाजपावर निशाणा साधण्यात आल्याचे दिसत आहे.