डोंबिवली - गणेशमूर्तींच्या विक्रीकरिता दिलेली घसघशीत सूट आणि क्षमतेपेक्षा जास्त मूर्ती घडवण्यात आलेले अपयश यामुळे पश्चिमेतील चिनार मैदानातील आनंदी कला केंद्राचा संचालक प्रफुल्ल तांबडे यांच्यावर गणेशमूर्ती वाऱ्यावर सोडून पलायन करण्याची वेळ सोमवारी रात्री आली. ही वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि गणेशभक्तांनी चिनार मैदानाकडे धाव घेतली. हाताला लागेल ती गणेशमूर्ती घेऊन अनेकजण घरी निघून गेले. त्यामुळे कासवावर आरूढ गणेशमूर्तीची ऑर्डर देणाऱ्यांच्या घरात यंदा बालगणेश पाहायला मिळणार आहे, तर बालगणेशाची मूर्ती हौसेखातर बुक केलेल्यांना फेटाधारी गणेशमूर्तीवर समाधान मानावे लागेल. तांबडे यांच्यावर विष्णुनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
गणेशोत्सवानिमित्त भक्तांची बुकिंग केलेल्या गणेशमूर्ती नेण्यासाठी लगबग आनंदी कला केंद्रावर होती. सोमवारी रात्री नऊ-दहा वाजेपर्यंत काहींनी गणेशमूर्ती घरी नेल्या, परंतु काही मूर्तींचे रंगकाम अर्धवट स्थितीत होते. याबाबत विचारणा करणाऱ्या ग्राहकांना मंगळवारी संध्याकाळपर्यंत रंगकाम करून मूर्ती देतो, असे तांबडे विनवत होते. यावर काही ग्राहकांसोबत तांबडे यांचा वाद होत होता. अल्पावधीत एवढ्या मूर्ती रंगवून देणे अशक्य असल्याची जाणीव झाल्याने तांबडे रात्री ११ वाजता परागंदा झाले.
सूट देणे आले अंगाशीमातीची एक फुटाची मूर्ती एक हजार १११ रुपये, तर दोन फुटांची मूर्ती सहा हजार रुपयांऐवजी चार हजार ५०० अशी जाहिरात तांबडे यांनी केली होती. किमतीत सूट मिळेल, या आशेने अनेकांनी त्यांच्याकडे मूर्तींचे बुकिंग केले होते. मूर्ती घडविण्यासाठी पेणवरून कारागीर आणले होते. त्यांचे मानधन तांबडे यांनी थकविल्याची चर्चा आहे.
तांबडे आले होते रडकुंडीलासोमवारी संध्याकाळी मूर्ती घ्यायला आलो. त्यावेळी तांबडे हे चिंतेत होते. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. ग्राहक त्यांच्याशी वाद घालत असल्याने ते घाबरले होते, असे काही ग्राहकांनी सांगितले.
केंद्रावरील या ‘आनंदीआनंदाची’ वार्ता पोलिसांच्या कानावर आनंदी कला केंद्राचा संचालकाने पलायन केल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच बुकिंग केलेल्या ग्राहकांनी केंद्राकडे धाव घेतली. यामुळे त्यामुळे केंद्रावर गोंधळ उडाला. काही ग्राहकांनी तयार असलेल्या मूर्ती उचलून ते घरी अथवा मंडपात घेऊन गेले. केंद्रावरील या ‘आनंदीआनंदाची’ वार्ता विष्णुनगर पोलिसांच्या कानावर जाताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.