पोलिसांवर कारवाई करणार कोण?
By Admin | Updated: August 22, 2016 01:11 IST2016-08-22T01:11:18+5:302016-08-22T01:11:18+5:30
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जातो.

पोलिसांवर कारवाई करणार कोण?
पिंपरी : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, त्यांच्याच खात्याच्या अधिकाऱ्यांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. मोटारींच्या काचांना काळ्या फिल्म लावल्यास सामान्य नागरिकांकडून दंड वसूल केला जातो. मात्र, पोलीसच व्यक्तिगत वापराच्या मोटारींच्या काचांना राजरोसपणे काळ्या फिल्म लावून फिरत आहेत. अशा नियम मोडणाऱ्या पोलिसांवर कोण कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
परवाना नाही, दंड फाडा, नंबर प्लेट नाही, दंड फाडा, ट्रीपल सीट आहे, दंड फाडा, तसेच मोटारीला काळ्या काचा असल्यासदेखील दंड फाडला जातो. हे नियम केवळ सामान्य नागरिकांसाठी आहेत. पोलीस खात्यातील अनेक अधिकाऱ्यांकडे व्यक्तिगत मोटारी आहेत. त्या मोटारींच्या काचांना आरटीओच्या नियमांचे उल्लंघन करून त्यावर काळ्या रंगाची फिल्म लावली जाते. मोटारीला काळ्या काचा असल्यास सामान्य नागरिकांना दंड केला जात असताना पोलीस अधिकारी मात्र बिनधास्तपणे मोटारींच्या काचांना काळ्या फिल्म लावून फिरत असतात.
रस्त्यांवर मोटारीने फिरण्यासह पोलीस ठाण्यातही अशा प्रकारच्या काळ्या काचा असणारी मोटार घेवून येतात. याकडे वरिष्ठ अधिकारीही दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. या बेशिस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे कोण लक्ष देणार? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावरून असे दिसते की, सामान्यांना कायदा शिकविणाऱ्या पोलिसांकडूनच कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. (प्रतिनिधी)
>सध्या पोलीस खात्यातील बहुतेक अधिकारी आलिशान मोटारीनेच ठाण्यात येतात. त्या वेळी त्यांची वाहने ठाण्याच्या आवारातच उभी केलेली असतात. त्याच्या काचांना फिल्म लावलेली असतेच. शिवाय, त्यावर रेडियमने पोलीस असाही उल्लेख केलेला दिसतो. हे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेसमोर सुरू असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. मोटारीच्या काचा काळ्या करणाऱ्या चालकाला मोटार वाहन कायदा १००/१७७ प्रमाणे कारवाई केली जाते.