बापाने विकलेल्या तिचा रक्षणकर्ता कोण?
By Admin | Updated: March 1, 2017 05:34 IST2017-03-01T05:34:11+5:302017-03-01T05:34:11+5:30
पोटच्या मुलीची पुढे अनेकदा विक्री झाली. देह व्यापारात अडकलेल्या या मुलीची स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने सुटका झाली.

बापाने विकलेल्या तिचा रक्षणकर्ता कोण?
राहुल अवसरे,
नागपूर- दारुड्या बापाने विकलेल्या पोटच्या मुलीची पुढे अनेकदा विक्री झाली. देह व्यापारात अडकलेल्या या मुलीची स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने सुटका झाली. आता या दुर्दैवी अल्पवयीन मुलीला पुन्हा देहव्यापारात गुंतवण्याचा प्रयत्न होत असून
तिच्या कथित मावशीने मागितलेला तिचा ताबा न्यायालयाने फेटाळला आहे. ही १७ वर्षीय मुलगी राजस्थानच्या जहाजपूर जिल्ह्यातील आहे. दारूच्या आहारी गेलेल्या तिच्या वडिलाने तिची विक्री माधवपुरा चौथका बरवाडा येथील ग्यानताबाई हिला केली होती. ग्यानताबाईने एक-दीड वर्षे तिच्याकडून देहव्यापार करवून घेतला होता. तिला मुलगा झाला, तिचे मूल हिसकावून पुन्हा तिच्याकडून व्यवसाय करवून घेतला. ही मुलगी रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या वडिलांकडे गेली होती. पुन्हा दारुड्या बापाने आपल्या चुलत भावाकडे तिचा ताबा देऊन तिला नागपूरला पाठविले होते. या ठिकाणी तिला विकण्यात आले. इंदिराबाई हट्टेसिंग कालखोर ही या मुलीला आपल्या ताब्यात ठेवून तिच्याकडून देहव्यापार करवून घेत होती.
पीडित मुलगी ही आपल्या बहिणीची मुलगी आहे, असा दावा करून तिचा ताबा मागणाऱ्या धनीदेवीचा अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. दास यांच्या न्यायालयाने फेटाळला. सरकारी वकील माधुरी मोटघरे यांनी धनीदेवी ही पुन्हा पीडित मुलीला देह व्यापारात गुंतवण्याची शक्यता असून तिचा अर्ज फेटाळल्या जावा, अशी विनंती न्यायालयाला केली होती. त्यानुसार न्यायालयाने निर्णय दिला. परंतु तिचा रक्षणकर्ता कोण, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
>स्वयंसेवी संस्थेचा पुढाकार
एका स्वयंसेवी संस्थेला या मुलीची कर्मकहाणी समजली. पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली. २३ नोव्हेंबर २०१६ रोजी गंगाजमुनातील इंदिरा कालखोरच्या कोठ्यावर धाड घालून या मुलीची सुटका करण्यात आली. पोलिसांनी गुन्हे दाखल करून इंदिरा कालखोर, हिम्मो गोपाल कालखोर आणि राधिका गोपाल कालखोर यांना अटक केली. तर तिला शासकीय वसतिगृहात ठेवण्यात आले आहे.