नागपूर - पंतप्रधान मोदी यांचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आलेली नाही. जिथपर्यंत माझ्या नावाची चर्चा आहे, त्यात काही अर्थ नाही. मोदी आमचे नेते आहेत. ते अनेक वर्षे काम करत राहतील. आमच्यासह संपूर्ण देश त्यांना २०२९ मध्येही पंतप्रधान म्हणून पाहण्यास इच्छुक आहे. या विषयावर चर्चा करण्यातच अर्थ नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर सोमवारी नागपुरात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराधिकारीबाबत सुरू असलेल्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम लावला आहे. भारतीय संस्कृतीत जोवर वडील असतात, तोवर मुलांबाबत विचार होत नाही. मोगलाई संस्कृतीमध्ये वडील असताना मुलांवर विचार केला जात होता, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज्याचा कारभार व्यवस्थित सुरूमनसे नेते राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले, राज्याचा कारभार व्यवस्थित चालवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सर्वांची साथ व सर्वांना विश्वासात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जेथे मराठी भाषेचा उपयोग आवश्यक आहे तेथे तो व्हायलाच हवा. या संदर्भातील मागणी करणे चुकीचे नाही. पण यासाठी कुणी कायदा हाती घेऊ नये.
औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन होणार नाहीऔरंगजेबच्या कबरीबाबत निर्माण झालेल्या वादावर फडणवीस म्हणाले, ही जागा एएसआयतर्फे संरक्षित आहे. आता औरंगजेबाची कबर चांगली वाटो अथवा नाही, तिला ६० वर्षांपूर्वीच संरक्षण दिले आहे. अशात कायद्याचे पालन करणे हीच आमची जबाबदारी आहे. मात्र, औरंगजेबच्या कबरीचे महिमामंडन होऊ देणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.