इंद्राणीची पाहुणी कोण?
By Admin | Updated: October 9, 2015 01:36 IST2015-10-09T01:36:59+5:302015-10-09T01:36:59+5:30
शीना बोरा हत्याकांडातील मुख्य सूत्रधार इंद्राणी मुखर्जी बेशुद्ध पडण्यापूर्वी तिला भेटण्यासाठी आलेल्या तरुणीमुळे संशय व्यक्त करण्यात येत आहे. कारागृहाच्या नोंदवहीत ओळख दडवून

इंद्राणीची पाहुणी कोण?
- मनीषा म्हात्रे, मुंबई
शीना बोरा हत्याकांडातील मुख्य सूत्रधार इंद्राणी मुखर्जी बेशुद्ध पडण्यापूर्वी तिला भेटण्यासाठी आलेल्या तरुणीमुळे संशय व्यक्त करण्यात येत आहे. कारागृहाच्या नोंदवहीत ओळख दडवून या तरुणीने इंद्राणीला भेटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांनी तिला अडवून माघारी पाठवले. या संशयास्पद तरुणीच्या भेटीने शीना बोरा हत्याकांडाला नवीन वळण येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.
भायखळा येथील कारागृहात रवानगी केल्यापासून इंद्राणीला भेटण्यासाठी कोणीही आले नव्हते. त्यातही २४ सप्टेंबरपासून फक्त तिच्या वकील गुंजन मंगला यांनी पाचवेळा तिची भेट घेतली होती. यातच १९ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत असलेली इंद्राणी २ आॅक्टोबर रोजी कोठडीत बेशुद्ध पडली. या प्रकरणी तिचा जबाब घेतला.
या जबाबाची पडताळणी होत असताना, इंद्राणी बेशुद्ध पडण्यापूर्वी तिला एका तरुणीने भेटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती कारागृहाचे पोलीस महासंचालक बिपीनकुमार सिंह यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. रुग्णालयाकडून देण्यात आलेली औषधे कर्मचारी स्वत:च्या हाताने इंद्राणीला देत आहेत.
तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. तुरुंगातील मानसोपचार तज्ज्ञ वाढवले आहेत. सीबीआयकडून येत्या दोन दिवसांत तिचा जबाब नोंदविण्यात येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, इंद्राणीने ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारले असल्याने, तिच्या अटकेनंतर हे प्रकरण जाणून घेण्यासाठी ब्रिटिश दुतावासाचे अधिकारी तुरुंगात येणार आहेत.
‘ते’ पत्र पोलिसांनीही वाचले
इंद्राणीने कोठडीत गेल्यापासून पीटर मुखर्जीला चार पत्रे लिहिली आहेत. त्यापैकी दोन पत्रांचे उत्तर तिला मिळाले होते. हे पत्र कारागृहातील पोलिसांनीही वाचले असून, या माहितीचा समावेशही अहवालात करण्यात येईल.
सीसीटीव्ही महत्त्वपूर्ण दुवा
कोठडीत इंद्राणी बेशुद्ध पडल्यानंतर कोठडीबाहेर असलेल्या पॅसेजमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये इंद्राणी बेशुद्धावस्थेनंतरचा घटनाक्रम कैद झाला आहे. कारागृहाकडून सादर करण्यात येणारा अहवालात हे फुटेज महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
महिन्याला दोन हजारांची मनी आॅर्डर
इंद्राणीला घरचे जेवण देण्यास मनाई असल्याने इतरांप्रमाणे तिलादेखील कारागृहातील जेवण देण्यात येत आहे. कारागृहाच्या उपहारगहातून बिस्लेरी बॉटल्स अथवा इतर खाण्याच्या वस्तू घेण्यासाठी तिला दर महिन्याला २ हजारांची मनी आॅर्डर येत आहे.
अहवाल प्रतीक्षा
कारागृहातील कैदी, कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले आहेत. इंद्राणीच्या घटनेनंतर काहीजण रजेवर गेले होते. त्यांचेही जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे. काही वैद्यकीय अहवाल येणे बाकी असल्याने संपूर्ण अहवाल तयार होण्यास आणखी १ ते २ दिवस लागण्याची शक्यता आहे. सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर अहवाल गृहविभागाकडे सादर करण्यात येणार आहे.