उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात कोण?
By Admin | Updated: November 3, 2014 03:52 IST2014-11-03T03:52:46+5:302014-11-03T03:52:46+5:30
मुळे सोमवार हा नवीन मंत्रिमंडळाचा पहिला कार्यालयीन कामकाजाचा दिवस असला तरी मंत्री मंत्रालयात बसून कामकाज करु शकतील किंवा कसे याबाबत स्पष्टता नाही
उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात कोण?
मुंबई : भाजपाच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद असणार नाही हे जरी उघड असले तरी मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांचे अन्य मंत्र्यांपेक्षा प्रशस्त असलेले दालन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे सोपवले जाणार की अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार मिळवणार, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले
आहेत.
मंत्र्यांच्या दालनाचे अजून वाटप झालेले नाही व खुद्द मुख्यमंत्री हे दोन दिवस नागपूरमध्ये असतील. त्यामुळे सोमवार हा नवीन मंत्रिमंडळाचा पहिला कार्यालयीन कामकाजाचा दिवस असला तरी मंत्री मंत्रालयात बसून कामकाज करु शकतील किंवा कसे याबाबत स्पष्टता नाही. मंत्रालयाचे नुतनीकरण केल्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची दालने ही अन्य मंत्र्यांपेक्षा ४०० चौ.फू.ने अधिक मोठी आहेत. नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री नसला तरी हे दालन ज्येष्ठतेच्या निकषानुसार एकनाथ खडसे यांच्या ताब्यात राहणार की माजी उपमुख्यमंत्री अर्थ खात्याचे मंत्री होते त्यामुळे विद्यमान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जाणार याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. खडसे व मुनगंटीवार या दोघांनाही महसूल खाते हवे होते. अखेरीस खडसे यांच्याकडे महसूल खाते गेले. गृह खात्याने हुलकावणी दिलेले शिक्षण खात्याचे मंत्री विनोद तावडे यांचा माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पहिल्या मजल्यावरील दालनावर डोळा असल्याचे कळते.
मंत्र्यांच्या दालनाबरोबरच बंगल्यांचे वाटप हाही कळीचा मुद्दा ठरणार आहे. रामटेक या बंगल्यात मागील युती सरकारच्या काळात गोपीनाथ मुंडे यांचे वास्तव्य होते. त्यामुळे हा बंगला मिळावा ही पंकजा मुंडे यांची अपेक्षा असल्याचे बोलले जाते. याचबरोबर काही सजवलेल्या बंगल्यांवर काही मंत्र्यांचा विशेष डोळा आहे. मात्र मागील सरकारमधील काही मंत्र्यांनी बंगले सोडलेले नाहीत. त्यामुळे नव्या मंत्र्यांना हवे असलेले बंगले लागलीच उपलब्ध होतील किंवा कसे याबाबत शंका आहेत. मंगळवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत निर्णय घेणार असल्याचे समजते. (प्रतिनिधी)