आपण कुणासोबत? महिला की दारूवाल्यांच्या?

By Admin | Updated: January 25, 2015 00:57 IST2015-01-25T00:57:51+5:302015-01-25T00:57:51+5:30

स्त्रियांच्या दैन्याची, व्यसनाधीनांच्या मरणाची आणि त्यांच्या मुला-मुलींच्या हतप्राय आयुष्याची कहाणी सांगणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी आंदोलनाचा एकाकी लढा अखेर यशस्वी झाला.

Who are you with Women's alcoholics? | आपण कुणासोबत? महिला की दारूवाल्यांच्या?

आपण कुणासोबत? महिला की दारूवाल्यांच्या?

चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी: समाजकंटक चवताळले
गजानन जानभोर - नागपूर
स्त्रियांच्या दैन्याची, व्यसनाधीनांच्या मरणाची आणि त्यांच्या मुला-मुलींच्या हतप्राय आयुष्याची कहाणी सांगणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी आंदोलनाचा एकाकी लढा अखेर यशस्वी झाला. कुठल्याही पाठबळाविना घरादारात विरोध असताना या अशिक्षित, असंघटित महिला चार वर्षांपासून लढत होत्या. मजुरी बुडवून, नवऱ्याचा रोष पत्करून, मुलाबाळांना वाऱ्यावर सोडून त्या आंदोलनात, मोर्चात सहभागी व्हायच्या. दारुबंदीला विरोध करणारे दारुविक्रेत्यांचे पाठीराखे या महिलांना त्रास द्यायचे. त्यांच्या सभा उधळून लावायचे, कुटुंबीयांचा छळ करायला लावायचे. या दारुविक्रेत्यांच्या, त्यांच्या सग्यासोयऱ्यांच्या त्रासाला न जुमानता या महिला अखेरपर्यंत लढत राहिल्या.
सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी जाहीर केल्यानंतर गावागावांत आनंदाचे वातावरण असताना आता काही समाजकंटक दारुबंदी आंदोलनातील महिलांना जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. दारुबंदीच्या आंदोलनाला अगदी प्रारंभापासून पाठिंबा देणारे किंबहूना त्यासाठी राजकीय नफ्या-तोट्याचा विचार न करता सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडणारे राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही हे समाजकंटक धमक्या देत आहेत. खरेतर दारुबंदी जाहीर झाल्यानंतर या निर्णयाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आंदोलनातील कार्यकर्ते पुन्हा एकवटत आहेत, जनजागृतीसाठी गावागावांत जाण्यासाठी त्यांची तयारी सुरू आहे, अशावेळी त्यांना कुणी त्रास देत असतील तर राज्य सरकारने या समाजकंटकांचा कठोरपणे बंदोबस्त करण्याची गरज आहे. गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यातील दारुबंदीचे ‘दुष्परिणाम ’आपण सर्वजण पाहात आहोत. दारुबंदी नसताना या दोन जिल्ह्यात जेवढी दारुविक्री होत नव्हती त्यापेक्षा जास्त दारू आज तिथे विकली जात आहे. प्रशासनाला आस्था नाही, पोलिसांचा वचक नाही, सर्वांचे ‘गुत्ते आणि हप्ते’ ठरलेले आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे पिणाऱ्यांना कळते पण वळत नाही अशी विदारक परिस्थिती या दोन जिल्ह्यांत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत दारुबंदीचा निर्णय घेतला आणि तसे परिपत्रक काढले की एका क्षणात दारुबंदी होते, असे सरकारला वाटले अन् तिथेच फसगत झाली. आता हीच परिस्थिती चंद्रपूर जिल्ह्यात निर्माण होणार आहे. ती तशी व्हावी असे काही राजकीय नेत्यांना वाटते. दारुवाल्यांच्याही मनात तेच आहे.
पाच वर्षांपूर्वी गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीसमोर दारुबंदीच्या आंदोलनाची शपथ घेताना या महिलांनी दारूला समाजातून हद्दपार करण्याची खूणगाठ बांधली होती. आंदोलनातील ज्येष्ठ कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी आणि त्यांचे कार्यकर्ते मोर्चात, सभांमध्ये सातत्याने सांगत होते की, ‘आमचे आंदोलन केवळ सरकारी आदेशापुरते मर्यादित नाही. शासनस्तरावर निर्णय झाल्यानंतर त्याची गावागावांत यशस्वी अंमलबजावणी करणे, व्यसनाधीनांचे पुनर्वसन करणे, उद्ध्वस्त झालेले संसार पुन्हा उभारणे हीच या आंदोलनाची सार्थकता आहे’. आज त्या दिशेने या महिला निघाल्या असताना त्यांच्या पाठीशी सरकारने आणि समाजाने भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे.
दारुबंदीच्या निर्णयाला उशीर होत असताना आपणच वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवारांना वारंवार स्मरण करुन देत होतो, त्यांच्या हेतूबद्दल शंकाही घेत होतो. या क्रांतिकारक निर्णयासाठी प्रसंगी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची हिंमत दाखविणाऱ्या मुनगंटीवारांना आता हे समाजकंटक धमक्या देत असतील तर त्यांनाही आपण भक्कम पाठबळ देण्याची गरज आहे.
दारुबंदीमुळे चवताळलेले दारुविक्रेते त्यांच्या व्यवसायाच्या गरजेनुसार तसे वागणारच. त्यांनी यापूर्वी चंद्रपुरात, विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात मोर्चा काढून समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या गोष्टींचं निर्लज्जपणे जाहीर समर्थनही करुन बघितले आहे. त्यांच्या धंद्यातील हीच ‘गुणवत्ता’आहे. पण समाज म्हणून आपले काही कर्तव्य आहे की नाही? कुणाच्या पाठीशी उभे राहावे आणि कुणाला विरोध करावा याचा विवेकी विचार करणार की नाही? चांगली माणसे कधीच एकत्र येत नाहीत, संघटितही होत नाहीत.
वाईट माणसे मात्र एकत्र येतात, संघटित होतात, दारुवाल्यांच्या मोर्चात सहभागी होतात आणि महिलांना धमक्याही देतात.आपण कुणाच्या पाठीशी उभे राहणार? दारुबंदीसाठी लढणाऱ्या महिलांच्या की दारूवाल्यांच्या? चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदीच्या निमित्ताने या प्रश्नाचा प्रत्येकानेच अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे.

Web Title: Who are you with Women's alcoholics?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.