कोण आहेत शोभा डे? मराठी कलाकारांनी उडवली खिल्ली
By Admin | Updated: April 11, 2015 10:11 IST2015-04-11T10:11:00+5:302015-04-11T10:11:00+5:30
दिग्दर्शक रवी जाधव यांनी तर कोण आहेत या शोभा डे, मला शोभायात्रा माहीत आहेत, शोभा दिवस नाही असे सांगत त्यांची खिल्ली उडवली आहे

कोण आहेत शोभा डे? मराठी कलाकारांनी उडवली खिल्ली
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - शोभा डे यांनी प्राइम टाइममध्ये मराठी सिनेमे दाखवण्याच्या राज्य सरकारने केलेल्या सक्तीला केलेल्या विरोधाचा मराठी फिल्म इंडस्ट्रीने समाचार घेतला आहे. अनेक ख्यातनाम मराठी कलाकारांनी राज्याच्या निर्णयाचे स्वागत करताना शोभा डे यांच्यावर सडकून टीका केली आहे. दिग्दर्शक रवी जाधव यांनी तर कोण आहेत या शोभा डे, मला शोभायात्रा माहीत आहेत, शोभा दिवस नाही असे सांगत त्यांची खिल्ली उडवली आहे.
पुष्कर जोगनेही मराठी फिल्म इंडस्ट्री व बॉलीवूड महाराष्ट्रात असल्याचा दाखला देताना, तामिळ तेलगू चित्रपटांना ५० टक्के प्राइम मिळत असल्याचे सांगत शोभा डे यांना काय वाटतं याची फिकीर करायची गरज नसल्याची भावना व्यक्त केली आहे.
तर नवोदित कलाकार आदिनाथ कोठारे यांनेही काही बोलायच्या आधी मराठी सिनेमाला कशाला तोंड द्यायला लागतं याचा अभ्यास शोभा डे यांनी करायला हवा होता अशी टिप्पणी केली आहे.
अंकूर काकटकर या दिग्दर्शकाने वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देण्यात आलेली पेज-३ लेखिका म्हणजे शोभा डे अशी संभावना करत शोभा डे यांचा उल्लेख केला तरी त्यांना वाटेल की त्यांना महत्त्व आहे अशी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शोभा डेंना सॉफ्ट पॉर्न लिहू दे असं सांगत त्यांना महत्त्व द्यायची गरज नाही असं मतही काकटकरांनी व्यक्त केलं आहे.