कोल्हापूर : विधानसभेचे दोन्ही अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविना पार पडले. विधानसभा विरोधी पक्षनेते निवडण्यासाठी मुख्यमंत्री म्हणतात, अध्यक्ष योग्यवेळी निर्णय घेतील. आता योग्य वेळ कधी येणार? यासाठी आता कोणते पंचांग बघायचे, असा उपहासात्मक सवाल काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते, आमदार सतेज पाटील पाटील यांनी उपस्थित केला. कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना शक्तिपीठ महामार्ग, गोकुळच्या राजकारणावर भाष्य केले.तर, शक्तिपीठाच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यासाठी आमदार शिवाजी पाटील आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या डोक्यावर बंदूक आहे. त्यामुळेच ते समर्थनार्थ मोर्चे काढत असल्याचा दावा पाटील यांनी केला. खासगीत ते शक्तिपीठाची गरज आहे का नाही हे अधिक विस्तृतपणे सांगतील, असा टोलाही लगावला. सातबारा उतारे जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्त केले असतील तर शक्तिपीठाच्या विरोधात एवढ्या हरकती का आल्या, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
हा तर मोठा विनोदच पूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाचे राजकारण होते, त्याला खीळ घालण्याचे काम कुणी केले? पैशाचे राजकारण या जिल्ह्यामध्ये प्रथम कोणी आणले, याचा इतिहास महादेवराव महाडिक यांनी तपासावा. त्यामुळे गोकुळच्या टोकनवरून त्यांनी टीका करणे हा तर मोठा विनोदच आहे, अशी कोपरखिळी आमदार पाटील यांनी लगावली.