हनीसिंग लपलाय कुठे ?

By Admin | Updated: November 26, 2014 01:02 IST2014-11-26T01:02:56+5:302014-11-26T01:02:56+5:30

वेगळ्या धाटणीच्या गाण्यांमुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत झालेला पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग एवढा लोकप्रिय आहे की, तो कोणत्या वेळी कोठे असेल याची माहिती योग्य माध्यमाने प्रयत्न केल्यास सहज मिळू शकते.

Where is Honey Singh hidden? | हनीसिंग लपलाय कुठे ?

हनीसिंग लपलाय कुठे ?

पोलीस हतबल : हायकोर्टात मांडली अपयशाची गाथा
नागपूर : वेगळ्या धाटणीच्या गाण्यांमुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत झालेला पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग एवढा लोकप्रिय आहे की, तो कोणत्या वेळी कोठे असेल याची माहिती योग्य माध्यमाने प्रयत्न केल्यास सहज मिळू शकते. परंतु, पाचपावली पोलिसांना हनीसिंग आकाशात लपलाय की पाताळात असा प्रश्न पडला आहे. पाचपावली पोलिसांचे पथक हनीसिंगला शोधण्यासाठी दिल्लीला गेले होते. तेथून ते रिकाम्या हाताने परतले आहे. आता त्यांनी मुंबई गाठली आहे. पोलिसांची ही हतबलता अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे.
अश्लील गाण्यांच्या प्रकरणात योग्य तपास सुरू नसल्याची बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पाचपावली पोलिसांना फटकारले होते. यामुळे त्यांनी थेट हनीसिंगला गाठण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम यांनी मंगळवारी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात पोलिसांच्या कर्तबगारीपेक्षा हतबलताच जास्त झळकत आहे. हनीसिंगची विचारपूस करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सी. बी. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन करण्यात आले आहे. पथकात कॉन्स्टेबल दिनेश व शंभूसिंग यांचा समावेश आहे. हनीसिंगच्या संकेतस्थळावरील पत्ता पाहून पोलीस पथक नवी दिल्लीला गेले. नवी दिल्लीत त्यांना हनीसिंगचे कायमचे घर व कार्यालय सापडले नाही. स्थानिक लोधी कॉलनी पोलिसांनी हनीसिंगचा व्यवस्थापक आशिष जैन यांचा मोबाईल क्रमांक (9814044124) दिला. या क्रमांकावर संपर्क साधला असता जैन यांनी सहकार्य केले नाही. संकेतस्थळावर हनीसिंगचा जो दूरध्वनी क्रमांक आहे तो बंद होता. हनीसिंगचे कायदेविषयक सल्लागार जोव्हान यांनी प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे ई-मेल करण्याची सूचना केली. त्यानुसार २२ नोव्हेंबर रोजी ई-मेल पाठविण्यात आला. यानंतर जोव्हान यांच्याशी पुन्हा संपर्क होऊ शकला नाही.
आता पुढील चौकशीसाठी पोलीस पथकास मुंबईला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती निकम यांनी दिली. सरकारी वकील भारती डांगरे यांनी मुंबईतील तपासाची माहिती सादर करण्यासाठी वेळ देण्याची विनंती केल्यामुळे न्यायालयाने दोन आठवड्यांनंतर पुढील सुनावणी निश्चित केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रसपालसिंग रेणू यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
काय आहे याचिकेत
अश्लील गाणी गाणे, अश्लील गाण्यांच्या चित्रफिती व ध्वनीफिती काढणे या आरोपांखाली हनीसिंग व संबंधितांवर कडक कारवाई करण्यासाठी पाचपावली येथील व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांनी फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. यावरून गेल्या २६ एप्रिल रोजी पाचपावली पोलिसांनी हनीसिंग व नवी दिल्ली येथील बादशाह यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. हनीसिंगच्या अश्लील गाण्यांमुळे युवकांवर वाईट परिणाम होत आहे. समाजात असंस्कृत वातावरण निर्माण होत आहे. त्याला अश्लील गाणी गाण्यापासून थांबविण्यात यावे, अशी याचिकाकर्त्याची विनंती आहे.

Web Title: Where is Honey Singh hidden?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.