विठुरायाच्या ५०० हेक्टर जमिनी गेल्या कुठे?
By Admin | Updated: July 29, 2014 02:42 IST2014-07-29T02:42:25+5:302014-07-29T02:42:25+5:30
गेल्या काहीशे वर्षांत दानशूर भक्तांनी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास दान केलेल्या सुमारे ५०० हेक्टर जमिनींची कोणतीही नोंद मंदिर समितीकडे नसून

विठुरायाच्या ५०० हेक्टर जमिनी गेल्या कुठे?
मुंबई : गेल्या काहीशे वर्षांत दानशूर भक्तांनी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास दान केलेल्या सुमारे ५०० हेक्टर जमिनींची कोणतीही नोंद मंदिर समितीकडे नसून या जमिनी खासगी व्यक्तींच्या ताब्यात आहेत, अशी धक्कादायक बाब एका जनहित याचिकेच्या निमित्ताने समोर आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या जमिनींचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरिय समिती नेमण्याची सूचना सोमवारी केली.
हिंदू जनजागृती समितीने ही जनहित याचिका केली असून महाराष्ट्र व कर्नाटकमधील अनेक गावांमधील सुमारे ५०० हेक्टर जमिनी दानशूर भक्तांनी वेळोवेळी पंढरपूर मंदिरासाठी दान केल्या आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.
खासगी व्यक्तींच्या ताब्यात
असलेल्या या सर्व जमिनी मंदिर समितीने ताब्यात घेऊन त्यांचा विकास करावा आणि त्या पैशातून पंढरपूरला येणाऱ्या यात्रेकरूंना सोयी-सुविधा पुरवाव्यात, अशी त्यांची मागणी आहे. न्या. अभय ओक न्या. ए. एस. चांदूरकर यांच्या खंडपीठापुढे सोमवारी ही याचिका सुनावणीस आली तेव्हा हे प्रकरण गंभीर असल्याचे मत न्यायालयाने नोंदविले व या जमिनींचा शोध घेणे आवश्यक याहे, यावर भर दिला. या जमिनी नेमक्या कुठे आहेत, त्या सध्या कोणाच्या ताब्यात आहेत व त्यांचा काय वापर करण्यात येत आहे इत्यादी बाबींचा शोध घेण्यासाठी एक उच्चस्तरिय समिती नेमण्याची आवश्यकताही न्यायमूर्तींनी बोलून दाखविली. अशी समिती स्थापन करणार की नाही याचे उत्तर देण्यासाठी राज्य सरकार आणि मंदिर समितीस चार आठवड्यांचा वेळ देऊन सुनावणी तहकूब करण्यात आली. (प्रतिनिधी)