आॅटोच्या मीटरची चक्री फिरणार कधी ?

By Admin | Updated: August 28, 2014 02:07 IST2014-08-28T02:07:14+5:302014-08-28T02:07:14+5:30

सीताबर्डीवरून त्रिमूर्तीनगरात जायचे म्हटले की आॅटोचालकाकडून १०० रुपये आकारण्यात येतात. बर्डीवरून विमानतळावर जाण्यासाठी तर २०० रुपयापेक्षा एक रुपयाही कमी करायला

When will the wheels of the ATA rotate? | आॅटोच्या मीटरची चक्री फिरणार कधी ?

आॅटोच्या मीटरची चक्री फिरणार कधी ?

प्रवाशांची लूट : मीटरचा उपयोग काय?
नागपूर : सीताबर्डीवरून त्रिमूर्तीनगरात जायचे म्हटले की आॅटोचालकाकडून १०० रुपये आकारण्यात येतात. बर्डीवरून विमानतळावर जाण्यासाठी तर २०० रुपयापेक्षा एक रुपयाही कमी करायला कुणी तयार नसतो! बर्डीवरून मानेवाडा भागात जायचे तर अव्वाच्या सव्वा भाडे सांगण्यात येते! वर्षभरापूर्वी शहरातील सर्वच आॅटोंना ‘आरटीओ’ने डिजिटल मीटर बसविण्याची सक्ती केली. सर्व आॅटोंना मीटर लावण्यातही आलेत. परंतु प्रवाशांची लूट अद्यापही कायम असून उपराजधानीतील आॅटोंच्या मीटरची चक्री फिरणार कधी, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
राज्यात सर्वात महागडे दर नागपुरात पाहावयास मिळतात. येथील आॅटोचालक मीटरने आॅटो न चालविता ग्राहकांना मनमानी भाडे सांगून त्यांची लूट करतात. वर्षभरापूर्वी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने शहरातील सर्व आॅटोचालकांना डिजिटल मीटर बसविणे सक्तीचे करून धडक कारवाईला सुरुवात केली. त्यामुळे सर्व आॅटोचालकांनी हे डिजिटल मीटर आपल्या आॅटोला लावून घेतले. परंतु मागील एक ते दीड वर्षापासून हे मीटर बंद अवस्थेत आॅटोला लावलेले दिसत आहेत. शहरातील एकही आॅटोचालक मीटरने आॅटो चालविण्यास तयार होताना दिसत नाही. उलट ग्राहकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे सांगून हे आॅटोचालक ग्राहकांची लूट चालवितात. परंतू याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने कुठलेच पाऊल उचललेले दिसत नाही. त्यामुळे शहरातील आॅटोचालकांकडून प्रवाशांची होत असलेली लूट थांबविण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
अवैध वाहतुकीमुळे अडचण
सध्या शहरातील आॅटोचालक हे प्रवासीनुसार दर आकारतात. त्यात ते तीनपेक्षा अधिक प्रवासी बसवितात. प्रती प्रवासी दर लक्षात घेतले तर ते सामान्यजणांना परवडणारे वाटते. परंतु त्यासाठी प्रवाशांना आॅटो पूर्ण भरण्याची वाट पाहावी लागते. दाटीवाटीने बसावे लागते.
शहरात सध्याच्या घडीला १०,५०० आॅटो परवानाधारक आहेत. ४ हजार आॅटो खासगी आहेत. ७ हजाराच्या जवळपास ग्रामीण परवाना धारक आहेत. तर एक हजाराच्या जवळपास टाटा मॅजिक, अ‍ॅपे आहेत. यासोबतच आता ई-रिक्षाही आले आहेत. यापैकी परवानाधारक सोडले तर सर्व अवैध वाहतुकीत मोडतात. ग्रामीण परवाना असलेले ३ व ६ सीटर वाहने शहरात सर्रास चालतात.
आरटीओ व वाहतूक पोलिसांच्या समक्ष हा सर्व प्रकार सुरू आहे. परंतु थातूरमातूर कारवाईशिवाय काहीच होत नाही. प्रशासनाचे त्यांच्याशी साटेलोटे आहे. अवैध वाहतूक चालक कितीही प्रवासी बसवले तरी त्यांच्यावर कारवाई होताना दिसून येत नाही. यामुळेच परवानाधारक आॅटो चालकांमध्ये संताप आहे.
शहरातील आॅटो हे मीटरप्रमाणे चालावे, असे आम्हालाही वाटते. परंतु नियम आमच्यासाठीच का, आम्ही नियमाने वागतो, टॅक्स भरतो. तरी आमच्यावरच कारवाई केली जाते. असो, आम्ही मीटरने चालायला तयार आहोत. परंतु अवैध वाहतुकीचे काय? अवैध वाहतूक चालत राहणार आणि आम्ही नियमाने चालायचे का? अवैध वाहतुकीवर केवळ कारवाई नको बंदी हवी. तेव्हाच आम्हालाही स्वतंत्रपणे धंदा करता येईल, असे परवानाधारक आॅटो चालक म्हणतात. (प्रतिनिधी)
हकीम व आरटीए समितीच्या निर्देशांकडे दुर्लक्ष
आॅटोरिक्षा भाडेवाढीसंदर्भात शासनाने सेवानिवृत्त केंद्रीय सचिव पी.एम.ए. हकीम यांची एक सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीने २०१२ मध्ये आपला अहवाल शासनाला सादर केला. या अहवालात स्पष्ट करण्यात आले होते की, विविध आॅटोरिक्षा व टॅक्सी संघटनांचे पदाधिकारी आणि ग्राहक पंचायतचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून दरवर्षी मे महिन्यात दरवाढ ठरविण्यात यावी. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. तसेच शहरातील अवैध वाहतूक रोखण्यासाठी आरटीए म्हणजेच रिजनल ट्रान्सपोर्ट अ‍ॅथोरिटी ही महत्त्वपूर्ण संस्था आहे. तत्कालीन विभागीय आयुक्त आनंद लिमये, तत्कालीन पोलीस उपायुक्त अमितेश कुमार, तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके आणि उपायुक्त एम.एच. खान यांच्या समितीने ग्रामीण भाागातील आॅटो व वाहतुकीला शहराच्या हद्दीत बंदी घालावी. त्यांना शहरात येऊ देऊ नये, असे निर्देश दिले होते.
त्यापूर्वी उच्च न्यायालयाने सुद्धा तसे निर्देश दिले होते. परंतु त्यावर कारवाई होत नसल्याने परवानाधारक आॅटो चालकांचा धंदा मारला जात असल्याने त्यांच्यात नाराजी आहे.
आॅटोचालकांच्या दरवाढीला समर्थन नाही
राज्यात सर्वात जास्त आॅटोचे दर नागपुरात आहेत. इतर सर्व शहरात आॅटोचालक मीटरने आॅटो चालवितात. जोपर्यंत नागपूर शहरात मीटरने आॅटो चालत नाहीत, तो पर्यंत आॅटोच्या दरवाढीस आमचे समर्थन राहणार नाही. वेळोवेळी दरवाढीवरून संप पुकारून प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या आॅटोचालकांच्या आंदोलनाचा आम्ही निषेध करतो.
-अशोक पात्रीकर, महासचिव, महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ
महागाई पाहता रास्त मागणी
सरकारने पहिल्या एक किमीपर्यंतच्या टप्प्यासाठी १४ आणि दुसऱ्या एक. किमीसाठी १२ रुपये मीटर टेरिफ निश्चित केले आहे. आमची मागणी २० आणि १८ रुपये आहे. कारण महागाई वाढली आहे. पेट्रोल वाढले म्हणजे सर्वच वस्तू महागतात. तसेच अवैध वाहतुकीला सुद्धा तोंड द्यावे लागते. या सर्वांचा विचार केला तर आमची मागणी रास्त आहे.
विलास भालेकर, अध्यक्ष - विदर्भ आॅटोरिक्षाचालक फेडरेशन

Web Title: When will the wheels of the ATA rotate?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.