‘शॉपिंग मॉल’ना कधी येणार जाग?
By Admin | Updated: September 18, 2014 00:48 IST2014-09-18T00:48:17+5:302014-09-18T00:48:17+5:30
दहशतवादी संघटना अल कायदाने भारताला ‘टार्गेट’ करण्याची धमकी दिल्यानंतर केंद्र सरकारकडून निरनिराळ्या शहरांत सुरक्षा व्यवस्था वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दहशतवाद्यांचे ‘सॉफ्ट टार्गेट’

‘शॉपिंग मॉल’ना कधी येणार जाग?
सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा : दहशतवाद्यांचे ‘सॉफ्ट टार्गेट’ ठरण्याची भीती
अलशार खान - नागपूर
दहशतवादी संघटना अल कायदाने भारताला ‘टार्गेट’ करण्याची धमकी दिल्यानंतर केंद्र सरकारकडून निरनिराळ्या शहरांत सुरक्षा व्यवस्था वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दहशतवाद्यांचे ‘सॉफ्ट टार्गेट’ ठरू शकतील अशा जागांवर तर कडक बंदोबस्त राहणे अपेक्षित आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात नागपुरातील निरनिराळे शॉपिंग मॉल्स, मल्टिप्लेक्स यांची पाहणी केली असता अनेक ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्थाच नसल्याचे आढळून आले.
जसवंत तुली मॉल, कामठी मार्ग
या मॉलमध्ये सुरक्षा व्यवस्था फारशी मजबूत नाही व त्यामुळे कुणीही येथे सहजपणे प्रवेश करु शकतो. येणाऱ्या व्यक्तीची एकदाही तपासणी होत नाही. शिवाय मेटल डिटेक्टर वगैरेदेखील येथे नाही. परंतु या मॉलच्या आतमध्ये असलेल्या ‘मल्टिप्लेक्स थिएटर’मध्ये मात्र खासगी सुरक्षा एजन्सीला कंत्राट देण्यात आले आहे. येथे मोठ्या प्रमाणावर तपासणी यंत्रणा असून सुरक्षा रक्षक उपस्थित असतात. येथील सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ‘एटीएस’च्या (अॅन्टी टेररिस्ट स्क्वॉड)निर्देशांप्रमाणे १० हून अधिक ‘सीसीटीव्ही’ लवकरच लावण्यात येणार असल्याची माहिती ‘मॉल’चे व्यवस्थापक शंकर सोनकवर यांनी दिली
इटर्निटी मॉल, व्हेरायटी चौक
येथे सुरक्षा व्यवस्थेकडे लक्ष देण्यात आले आहे. दोन्ही प्रवेशद्वार व बाहेर निघण्याच्या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था आहे. या ठिकाणी ४० च्या आसपास सुरक्षा तसेच सफाई कर्मचारी उपस्थित असतात. शिवाय ‘मॉल’मध्ये प्रवेश करणाऱ्यांची तपासणी होते. सोबतच वाहनांची ‘पार्किंग’च्या अगोदर तपासणी होती. परंतु ‘मॉल’च्या पायऱ्यांवर बऱ्याच वेळा गर्दी असते व तेथे नेमके कोण बसले आहे हे तपासण्याची यंत्रणा अस्तित्वात नाही.
सेंट्रल मॉल, धरमपेठ
या ‘मॉल’च्या दोन्ही प्रवेशद्वारांवर योग्य सुरक्षा व्यवस्था अस्तित्वात नाही. ‘मेटल फ्रेम्स ’ व ‘मेटल डिटेक्टर’ येथे लावण्यात आले आहेत, परंतु याला टाळून अनेकजण आत प्रवेश करताना दिसून येतात. येथील तिन्ही मजल्यांवर अशीच स्थिती आहे. शिवाय ‘पार्किंग’मध्ये वाहनांची तपासणी होत नाही. येथील प्रशासन सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी मान्य करायला तयारच नाही. यासंदर्भात ‘मॉल’च्या व्यवस्थापनाचे सदस्य सुमित फ्रान्सिस यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी गैरवर्तन केले.
एम्प्रेस मॉल, कॉटन मार्केट
हा शहरातील सर्वात मोठा ‘शॉपिंग मॉल’ आहे. येथे सुरक्षा व्यवस्था तर आहे परंतु त्यात सुधारणेला बराच वाव आहे. येथे जवळपास ३० सुरक्षारक्षक असून ३ डझनांहून अधिक सीसीटीव्हीच्या माध्यमातून ‘मॉल’वर लक्ष ठेवण्यात येते. मुख्य प्रवेशद्वारावर येणाऱ्यांची तपासणी केली जाते. परंतु ‘पार्किंग’कडून येणाऱ्या मार्गावर तपासणीची व्यवस्था नाही. सोबतच ‘पार्किंग’मध्ये गाड्यांची तपासणी होत नाही. समोरच्या ‘पार्किंग लॉट’मध्येदेखील असेच चित्र आहे.