मार्डचे प्रश्न सुटणार कधी?
By Admin | Updated: June 30, 2015 03:15 IST2015-06-30T03:15:30+5:302015-06-30T03:15:30+5:30
एमबीबीएस झाल्यावर स्पेशलायझेशनसाठी तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. यानंतर एका वर्षाच्या बॉण्डवर डॉक्टरांना सही करावी लागते. ज्या शाखेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे,

मार्डचे प्रश्न सुटणार कधी?
मुंबई : एमबीबीएस झाल्यावर स्पेशलायझेशनसाठी तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. यानंतर एका वर्षाच्या बॉण्डवर डॉक्टरांना सही करावी लागते. ज्या शाखेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे, त्याच शाखेत डॉक्टरांना काम करण्याची संधी बॉण्डदरम्यान मिळाली पाहिजे, ही मार्डची प्रमुख मागणी आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला महत्त्वाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. स्पेशलायझेशनसाठी डॉक्टरांना तीन वर्षांचे शिक्षण पूर्ण करावे लागते. हे शिक्षण पूर्ण झाल्यावर १ वर्ष त्यांना बॉण्ड पूर्ण करणे बंधनकारक आहे. पण, या बॉण्डमध्ये डॉक्टरांना त्याच स्पेशलाईज्ड शाखेत काम करण्याची संधी मिळत नाही. फक्त ३० ते ४० टक्के डॉक्टरांनाच त्यांच्या स्पेशलाईज्ड शाखेत काम करण्याची संधी मिळते. उर्वरित ६० ते ७० टक्के डॉक्टरांना वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करावे लागते. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांचे वय साधारणत: २७ ते ३०च्या घरात असते. या वयात निकालानंतर लगेच बॉण्ड न मिळाल्याने घरी बसावे लागते. यामुळे निकालानंतर एका महिन्यात त्याच शाखेचा बॉण्ड द्यावा, असे मध्यवर्ती मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.
सुरक्षा, विद्यावेतनात वाढ या प्रश्नांसंदर्भात वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा झाली आहे. पण, लिखित स्वरूपात काहीही मिळाले नाही. रुग्णसेवा करत असताना, निवासी डॉक्टरांना टीबीची लागण होते. टीबी झाल्यावर रोगप्रतिकारशक्ती वाढणे आवश्यक असते. म्हणूनच टीबी झालेल्या निवासी डॉक्टरांना दोन महिन्यांची भरपगारी रजा द्यावी.
महिला निवासी डॉक्टरांना प्रसूतीसाठीदेखील भरपगारी दोन महिने रजा द्यावी अशीही आमची मागणी आहे. पण, कोणत्याच मागणीकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे २ जुलैपासून निवासी डॉक्टर सामूहिक रजा टाकण्याच्या पवित्र्यात असल्याचे डॉ. मुंदडा यांनी सांगितले.