मराठीला अभिजात दर्जा कधी मिळणार?
By Admin | Updated: May 3, 2017 03:14 IST2017-05-03T03:14:44+5:302017-05-03T03:14:44+5:30
यंदाच्या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र

मराठीला अभिजात दर्जा कधी मिळणार?
औरंगाबाद : यंदाच्या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठीजनांच्या पदरी निराशा पडली. महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त लागोपाठ तिसऱ्यांदा हुकला. त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळणार तरी कधी? असा संतप्त सवाल मराठी सारस्वतांकडून विचारला जात आहे.
राज्य शासन गठीत ‘अभिजात मराठी भाषा समिती’ने तयार केलेल्या अहवालास अकादमीच्या भाषा समितीने एकमताने सकारात्मक लेखी अभिप्राय देऊन २०१५ साली तो केंद्र सरकारकडे वर्ग केला. दर्जा देण्याच्या विरोधात वकील आर. गांधी यांनी मद्रास उच्च न्यायालयात दाखल के लेल्या याचिकेमुळे दोन वर्षांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी हा निर्णय प्रलंबित होता. मार्च महिन्यात मद्रास उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आणि महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधून केंद्र सरकार दर्जाची घोषणा करेल, अशी आस निर्माण झाली होती. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असूनही मराठीला दर्जा मिळवण्यास एवढा विलंब होतो. ही म्हणजे पराकोटीची राजकीय अनास्था याखेरीज दुसरे काय म्हणणार, असे निराशायुक्त उद्गार अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना काढले. एखाद्या औचित्याची वाट पाहणे सोडा आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा घोषित करावा, असे मत कवी दासू वैद्य यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)