उद्याने विकसित होणार कधी?
By Admin | Updated: March 6, 2017 01:15 IST2017-03-06T01:15:22+5:302017-03-06T01:15:22+5:30
रावेत, किवळे-विकासनगर व मामुर्डी (साईनगर) या भागाचा महापालिकेत समावेश होऊन २० वर्षे होत आली आहेत.

उद्याने विकसित होणार कधी?
किवळे : रावेत, किवळे-विकासनगर व मामुर्डी (साईनगर) या भागाचा महापालिकेत समावेश होऊन २० वर्षे होत आली आहेत. शहर विकास आराखड्यानुसार या भागात एकूण आठ ठिकाणी उद्यानांसाठी आरक्षण टाकले आहे. मात्र एकही आरक्षण ताब्यात घेऊन महापालिका प्रशासनाने उद्यान विकसित केलेले नाही. त्यामुळे उद्याने विकसित कधी होणार?, मुलांना खेळण्यासाठी त्याचा लाभ कधी मिळणार? असे प्रश्न नागरिक विचारत आहेत.
महापालिकेत ११ सप्टेंबर १९९७ ला एकूण १८ गावे समाविष्ट केली होती. त्यात किवळे-विकासनगर, रावेत व मामुर्डी (साईनगर) यांचा समावेश होता. स्थानिक जनतेच्या गरजांना प्राधान्य देऊन त्या सोडविण्यासाठी धोरणे आखून त्यांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना झालेली असली तरी महापालिका प्रशासनाला या भागात गेल्या १९ वर्षात आरक्षणे ताब्यात घेऊन एकही उद्यान विकसित करता आलेले नाही.
महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यानुसार किवळे व विकासनगर येथे चार ठिकाणी उद्यानांचे आरक्षण दिसत आहे. त्याकरिता विविध ठिकाणच्या एकूण साडेसात हेक्टर जागेवर आरक्षणे आहेत. मामुर्डी (साईनगर) येथे अर्ध्या हेक्टर जागा उद्यानासाठी आरक्षित आहे. रावेत येथे तीन ठिकाणी उद्यानांचे आरक्षण आहे. त्याकरिता तीन हेक्टर जागेवर आरक्षणे आहेत.
महापालिकेने आरक्षणे ताब्यात घेऊन उद्याने विकसित करावीत, अशी मागणी होत आहे. मात्र आरक्षणे ताब्यात घेण्याबाबत अत्यंत क्लिष्टता असल्याने प्रशासकीय कार्यवाहीत बालचमुंचा उद्यानात खेळण्याचा आनंद हिरावला जात असल्याचे नागरिक बोलत आहेत. (वार्ताहर)