शवागाराचे आधुनिकीकरण कधी करणार ?
By Admin | Updated: March 3, 2015 02:13 IST2015-03-03T02:13:18+5:302015-03-03T02:13:18+5:30
गोव्यातील शवागाराच्या धर्तीवर राज्यातील शवागारांचे आधुनिकीकरण केव्हापर्यंत कराल, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शासनाला केली आहे

शवागाराचे आधुनिकीकरण कधी करणार ?
नागपूर : गोव्यातील शवागाराच्या धर्तीवर राज्यातील शवागारांचे आधुनिकीकरण केव्हापर्यंत कराल, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शासनाला केली आहे आणि या संदर्भात २५ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सहयोग ट्रस्टने दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने हे निर्देश दिले़
न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन केलेल्या समितीने गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील शवागाराचा अभ्यास करून अहवाल सादर केला आहे. गोव्यातील शवागारात आधुनिक अवजारांच्या मदतीने शवविच्छेदन केले जाते. परिसरात दुर्गंधी नाही. शवविच्छेदनाची खोली सभागृहासारखी आहे. डॉक्टर शवविच्छेदन करीत असताना प्रशिक्षणार्थी एका ठिकाणी बसून मोठ्या स्क्रीनवर प्रक्रिया पाहू शकतात. मृतदेहाची माहिती संगणकात साठवून ठेवली जाते. यामुळे कागदी फाईल जपून ठेवण्याची आवश्यकता नाही, कायमस्वरूपी कर्मचारी आहेत. चौकशी केंद्र आहे, अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे. अशाच प्रकारची राज्यातही असावीत, यासाठी सहयोग ट्रस्टने याचिका दाखल केली होती. (प्रतिनिधी)