मुंबई : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन दोन महिने पूर्ण झाले आहेत. आता तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही विचारला आहे.
दमानिया यांनी एक्स समाजमाध्यमावर म्हटले आहे की, आज स्वर्गीय संतोष देशमुख यांना जाऊन २ महिने पूर्ण झाले. आज तरी राजीनामा घेणार का? आज संतोष देशमुख यांना आदरांजली म्हणून एक सविस्तर पत्र, ज्यात धनंजय मुंडे यांच्यावरचे सगळे आरोप, मी पुराव्यासकट मुख्यमंत्री, लोकायुक्त, अजित पवार, इलेक्शन कमिशन, सीबीआय, कॅग आणि लाचलुपचपत प्रतिबंधक विभागाला पाठवत आहे. यांचा पाठिंबा जर वाल्मीक कराडला नसता, तर ही क्रूर हत्या झाली नसती. अजून त्या स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या फोनचा डेटा देखील रिट्राइव झालेला नाही. तो बडा नेता कोण आहे, अजून का कळले नाही? जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिपदावर आहे, तोपर्यंत दबाव राहणार, असे दमानिया यांनी म्हटले आहे.
‘धनंजय मुंडेंनी पदापासून दूर व्हावे’भाजपचे आमदार सुरेश धस म्हणाले, अंजली दमानिया, करुणा मुंडे काय म्हणाल्या, यापेक्षा त्यांनी त्या पदापासून दूर व्हावे, अशाप्रकारची मागणी त्यांच्याच पक्षातले आमदार बऱ्यापैकी करत आहेत. आमच्या जिल्ह्यातील त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंके यांनी ती मागणी केली आहे. अनेक संघटना मागणी करत आहेत, पण मी स्वत: अजून त्यांचा राजीनामा मागितला नाही. या तपासात आकापर्यंत एसआयटी गेली आहे. आकाच्या पुढे गेल्यानंतर बोलू. त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा नाही घ्यावा, हे सर्वस्वी अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हातात आहे.
पोलिसांनी आरोपींना अभय दिले : धनंजय देशमुख
गुंडांसोबत पोलिस अधिकाऱ्यांची उठबस होती. त्यांनीच अभय दिले. त्यामुळेच हत्येची घटना घडल्याचा गंभीर आरोप मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला. सर्वात मोठे पाप हे केज पोलिसांनी केल्याचेही ते म्हणाले. भावाच्या हत्येला दोन महिने झाले, परंतु एक क्षणही आठवणीशिवाय जात नाही. या वेदना भयानक असून यातून कुटुंब आणि ग्रामस्थ अजूनही बाहेर आलेले नाहीत. तसेच या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा पोलिसांसोबत मांडीला मांडी लावून बसत होता. एका कार्यालयात त्यांचे चहापाणी होत असे. त्याला अभय दिले. त्याच्यावर वेळीच कारवाई केली असती तर अशा घटना टळल्या असत्या, असे देशमुख म्हणाले.
हत्येला दोन महिने झाले, तरी कृष्णा आंधळे नावाचा आरोपी अजून पोलिसांच्या हाताला लागलेला नाही. दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दररोज नव्या घोटाळ्यांचे आरोप होत आहेत, असे असताना त्यांचा राजीनामा का घेत नाही? -अंबादास दानवे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते.
बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडाचा मी अनेकदा निषेधच केला आहे. संपूर्ण प्रकरण सरकार संवेदनशील पद्धतीने हाताळत असून, या प्रकरणातून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा की नाही? हा निर्णय मुख्यमंत्री व दोघे उपमुख्यमंत्रीच घेतील. -पंकजा मुंडे, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री.