मुंबईच्या चारही नद्यांजवळ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कधी ?
By Admin | Updated: February 14, 2017 04:11 IST2017-02-14T04:11:00+5:302017-02-14T04:11:00+5:30
शहरातील चार मोठ्या नद्यांजवळ सांडपाणी प्रक्रिया केंद्र केव्हा उभारणार? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने यासंदर्भातील

मुंबईच्या चारही नद्यांजवळ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कधी ?
मुंबई : शहरातील चार मोठ्या नद्यांजवळ सांडपाणी प्रक्रिया केंद्र केव्हा उभारणार? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने यासंदर्भातील तपशिलवार माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेला दिले.
पावसाळ्यात नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.
२००५ सारखा महाप्रलय टाळण्यासाठी आणखी एका डॉप्लरची आवश्यक असल्याने हवामान खात्याला ते बसवण्याचा आदेश द्यावा, अशी मागनी याचिकाकर्ते व व्यवसायाने वकील असलेले अटल दुबे यांनी खंडपीठाकडे केली आहे.
२००५ च्या महाप्रलयासारखा प्रसंग पुन्हा उद्धवू नये, यासाठी सरकारने तोडगा काढण्याकरिता चितळे समितीची नियुक्ती केली. मात्र या समितीने केलेल्या शिफारशींची अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नाही, अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील सी.के. नायडू यांनी खंडपीठाला दिली.
चितळे समितीने त्यांच्या अहवालात मुंबईच्या चारही मोठ्या नदयांच्या जवळपास सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याची शिफारस केली होती. मात्र या शिफारशीची अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नाही.
त्यावर खंडपीठाने असमाधान व्यक्त केले. ‘२०१३ पासून अद्याप महापालिकेने समितीच्या शिफारशींवर अंमलबजावणी केली नाही, असे रेकॉर्डवरून दिसते. या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही (महापालिका) मेहनत घेतली पाहिजे. यंदाच्या पावसाळयापूर्वीच हे पूर्ण करणे अपेक्षित आहे,’ असे खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)