चंद्रभागेचे शुद्धीकरण कधी ?
By Admin | Updated: January 25, 2015 00:51 IST2015-01-25T00:51:27+5:302015-01-25T00:51:27+5:30
जलसंवर्धनाची चळवळ अधिक व्यापक व्हावी, या हेतूने देशभरात केंद्र सरकारने २०१५ हे जलक्रांती वर्ष म्हणून जाहीर केले आहे़

चंद्रभागेचे शुद्धीकरण कधी ?
समीर इनामदार- सोलापूर
जलसंवर्धनाची चळवळ अधिक व्यापक व्हावी, या हेतूने देशभरात केंद्र सरकारने २०१५ हे जलक्रांती वर्ष म्हणून जाहीर केले आहे़ नद्यांचा विकास आणि गंगेचे शुद्धीकरण यासाठी विशेष प्रयत्न सुरू असतानाच लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील चंद्रभागेचे शुद्धीकरण कधी होणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ तर दुसरीकडे चंद्रभागेला प्रदूषणमुक्त करण्यासाठी
स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची
मागणीही पुढे येत आहे़
राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रभागेचे शुद्धीकरण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती. आता केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्याने पंतप्रधान मोदी आश्वासन पाळणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे़
आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने चंद्रभागेला गटारगंगेचे आलेले स्वरूप बदलण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलणे अत्यावश्यक आहे. यापूर्वी चंद्रभागेच्या शुद्धीकरणासाठी अनेक सामाजिक संस्थांनी प्रयत्न केले. जलदिंड्यांच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले आहे. तरीही म्हणावे तितकेसे यश आले नसल्याचे वास्तव आहे़ प्रदूषणमुक्त चंद्रभागेसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे़ सोलापूर जिल्ह्यासाठी भीमा नदीचे पाणी हा पाण्याचा मुख्य स्त्रोत राहिला आहे. मात्र, प्रदूषणाबाबत नेमकी तक्रार करावयाची कोणाकडे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीच्या पाण्यावर सिंचन विभागाचे तर नदीच्या वाळूवर महसूल विभागाचा अधिकार आहे. प्रदूषणाकडे मात्र दोन्ही खाती दुर्लक्ष करीत असल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट झाले आहे़
प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा कागदावरच
प्रदूषण नियंत्रण मंडळाने भीमा नदी प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा तयार करून अनेक वर्षे उलटून गेली. पुणे जिल्ह्यातील मैलापाणी नदीमध्ये सोडल्याने नदी प्रदूषित झाली आहे़ याबद्दल कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत या आराखड्यात सूचना केल्या आहेत. मात्र याची अंमलबजावणी कितपत होते, हा संशोधनाचा विषय आहे. नदीत मोठ्या प्रमाणावर रासायनिक द्रव्ये सोडली जात असल्याने उजनी धरणात जलजन्यजीव धोक्यात आले आहेत़ याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
प्रदूषणाची कारणे
नागरी वस्त्यांतून निर्माण होणारे सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी, निचरा होणारे लिचेट, वाळू उपसा, नदीत पाणी नसणे, जलपर्णीची वाढ, गाळाचे प्रमाण ही प्रदूषणाची मुख्य कारणे आहेत.
चंद्रभागेचे शुद्धीकरण हे पुणे जिल्ह्यातूनच होणे आवश्यक आहे. दोन महापालिका, दहा नगरपालिका, दहा औद्योगिक वसाहतींमधून येणाऱ्या दुषित पाण्यामुळे चंद्रभागेला गटारगंगेचे स्वरुप आले आहे़ प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करीत असून, यासाठी स्वतंत्र प्राधिकरण निर्माण करावे.- अनिल पाटील, जलतज्ज्ञ