मुंबई : मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांनी अनाथ मुला - मुलींना राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये एक टक्का समांतर आरक्षण देण्याचा घेतलेला ऐतिहासिक निर्णय आणि त्यानंतर मोफत शिक्षणाची केलेली सोय याचा फायदा झालेल्या तरुण - तरुणींनी फडणवीस यांची शुक्रवारी वर्षा निवासस्थानी भेट घेत त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
अनाथ मुलांना आरक्षणाचा निर्णय माझ्या जीवनातील सर्वांत जास्त समाधान देणारा आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘संधीची समानता’ या तत्त्वाच्या प्रेरणेने शासनाने हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे ८६२ अनाथ युवक - युवती स्वावलंबी झाली याचा अभिमान वाटतो, शासनाच्या वर्षपूर्तीची सुरुवात सुंदर कार्यक्रमाने झाली, असे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी या तरुण - तरुणींशी संवाद साधला आणि त्यांना भेटवस्तूही दिली. आ. श्रीकांत भारतीय यावेळी उपस्थित होते.
बाल्यावस्थेत बालगृहाच्या पायरीवर सोडून देण्यात आले अशी अश्विनी आता वैद्यकीय अधीक्षक आहे. आरक्षणाचा फायदा कसा झाला हे सांगताना तिला गहिवरून आले. प्रणवने एमबीएनंतर तीस लाखाचे पॅकेज नाकारत स्टार्टअप उद्योग नागपुरात सुरू केला आहे. त्याला मोफत शिक्षणाचा लाभ मिळाला. त्यानेही आज भावृूक होत शब्दांना वाट करून दिली.
काही निर्णय मनाला गहिवर देतात...
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन आज मला एक वर्ष झाले. या वर्षपूर्तीची सुरुवात अतिशय सुंदर कार्यक्रमाने झाली. निःशब्द भाव खूप बोलणारा असतो, तसा भाव आज माझ्या मनात आहे. शासनात अनेक निर्णय घेतले जातात, अनेक कामे केली जातात. पण, काही निर्णय मनाला गहिवर देतात. तसाच अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय आहे. संघर्षातून पुढे आलेल्या युवक - युवतींनी इतरांसाठी रोड मॉडेल बनावे.
पोलिस निरीक्षक अभय तेली यांनी संचालन केले, तर ‘जाणीव’ या सामाजिक संस्थेचे मनोज पांचाळ यांनी आभार प्रदर्शन केले. हे दोघेही अनाथ आहेत.
या कार्यक्रमात विनायक विश्वकर्मा या युवकाने मुख्यमंत्री यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत एक भावस्पर्शी कविता सादर केली.“आज घ्यायला नाही सर,काही द्यायला आलोय,तुम्ही आरक्षण दिलं, दारिद्र्यातून बाहेर आलोयतुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, पण आम्ही तुम्हाला ‘देवाभाऊच’ म्हणणार”या ओळींनी भावनिक वातावरण निर्माण झाले.
Web Summary : Orphans expressed gratitude to Devendra Fadnavis for providing 1% reservation in government jobs and free education. Fadnavis said the decision, inspired by Dr. Ambedkar, helped 862 orphans become self-reliant. He interacted with them and presented gifts at Varsha residence.
Web Summary : अनाथों ने सरकारी नौकरियों में 1% आरक्षण और मुफ्त शिक्षा प्रदान करने के लिए देवेंद्र फडणवीस के प्रति आभार व्यक्त किया। फडणवीस ने कहा कि डॉ. अम्बेडकर से प्रेरित इस निर्णय से 862 अनाथ आत्मनिर्भर बने। उन्होंने वर्षा निवास पर उनसे बातचीत की और उपहार दिए।