सोन्याच्या गुणवत्तेचा कस लागतो तेव्हा...
By Admin | Updated: January 25, 2015 01:54 IST2015-01-25T01:54:41+5:302015-01-25T01:54:41+5:30
ग्राहकांची हीच गरज ओळखून सोन्याची शुद्धता तपासण्याचा उद्योग जैन बंधूंनी १८ वर्षांपूर्वी सुरू केला. या उद्योगाबद्दल...

सोन्याच्या गुणवत्तेचा कस लागतो तेव्हा...
एखाद्या सराफाकडून सोने किंवा सोन्याचे दागिने विकत घेताना त्याची किंमत ही त्या दागिन्याचे कॅरेट आणि वजन यांवर ठरवली जाते. सोने खरेदी करणारा ग्राहक दागिन्याचे वजन तर सराफाच्या पेढीतच करतो. मात्र त्याच्या शुद्धतेचे काय? सराफाने दिलेला दागिना नेमका किती कॅरेटचा आहे, हे आपणाला कसे कळणार. ग्राहकांची हीच गरज ओळखून सोन्याची शुद्धता तपासण्याचा उद्योग जैन बंधूंनी १८ वर्षांपूर्वी सुरू केला. या उद्योगाबद्दल...
झवेरी बाजारमध्ये सुनील आणि ललित या जैन बंधूंच्या उद्योगाचा पसारा वाढत असून, तितकीच त्यांच्याबाबतची विश्वासार्हताही वाढीस लागली आहे. सोन्यासह, चांदी, तांबे, अॅल्युमिनियम, शिसे, पितळ, प्लॅटिनम, टंगस्टन अशा विविध धातूंची शुद्धता तपासण्याचा त्यांचा उद्योग आहे. सोन्याची शुद्धता तपासण्यास आवश्यक यंत्रणा त्यांनी जर्मनीहून मागवली. या एका मशिनची किंमत सुमारे २५ ते ३० लाखांच्या घरात असून, जैन यांच्याकडे या घडीला ३ मशिन आहेत. मशिनमध्ये किमान ०.२५ मिलीग्रॅम तर कमाल १०० तोळे म्हणजेच १००० ग्रॅम इतक्या वजनाच्या सोन्याची तपासणी करता येते. सोन्याच्या तुकड्यास किंवा दागिन्याच्या तपासणीस अवघे ५० रुपये आकारले जातात.
मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या या उद्योगात मेहनतही तितकीच महत्त्वाची असते. सध्या जैन यांच्याकडे आठ तरुण काम करतात. त्यात दोन जण हे त्यांचे काऊंटर सांभाळतात. सोन्याची शुद्धता तपासण्यास आलेल्या ग्राहकाकडील सोन्याचे वजन करून प्रथम मालाची पावती तयार केली जाते. त्यानंतर ओबड-धोबड असलेले सोने ठोकून सरळ केले जाते. जर दागिना असेल, तर तो थेट तपासणीसाठी पाठवला जातो. ओबड-धोबड सोन्याची तपासणी अचूक होत नाही, म्हणून तो ठोकून सरळ करावा लागतो. त्यानंतर सोने फाईलिंगसाठी पाठवले जाते. त्यात एका प्लेटमध्ये ठेवलेल्या सोन्यावर स्क्रॅच केले जाते. दागिना असल्यास स्क्रॅच केला जात नाही.
स्क्रॅच केलेले सोने तपासणीसाठी मशिनमध्ये ठेवले जाते. या मशिनमध्ये एक्स-रे पॉइंट असून, त्याचे कनेक्शन शेजारील संगणकाला जोडलेले असते. स्क्रॅच केलेली जागा नेमकी एक्स-रे पॉइंटवर ठेवली जाते. पॉइंटमधून निघणारे एक्स-रे किरण सोन्याचा वेध घेऊन त्याची अचूक माहिती संगणकामध्ये फीड केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये जतन करते. अवघ्या ३० सेकंदांत एक तपासणी पूर्ण होते. अशा प्रकारे सोन्याच्या लांबी आणि प्रकारानुसार किमान एक तर कमाल तीनवेळा तपासणी केली जाते.
तुकड्याप्रमाणे तपासणी
सोन्याच्या तयार दागिन्यांच्या एका बाजूची तपासणी एकदाच केली जाते.
रवा आणि तुकडा असलेल्या सोन्याच्या दोन्ही बाजूंची प्रत्येकी एकदा तपासणी केली जाते. म्हणजेच दोन तपासण्या होतात.
याउलट लगडीच्या एकाच बाजूचे तीन वेगवेगळे पॉइंट प्रत्येकी एकवेळा तपासले जातात. म्हणजेच एकूण तीन तपासण्या केल्या जातात.
सोने तपासणीत सोन्यामध्ये कोणते धातू किती प्रमाणात मिसळलेले आहेत, याची माहिती मिळते. सोन्यात इतर धातूंचे प्रमाण जितके कमी तितके अधिक कॅरेटचे ते सोने असते. जितके अधिक कॅरेट तितका अधिक भाव असतो. साधारणत: शुद्ध सोन्यात थोड्याफार प्रमाणात चांदी, तर त्यापाठोपाठ तांबे, जस्त व इतर धातू मिसळलेले असतात. या धातूंच्या प्रमाणानुसार त्या सोन्याचे कॅरेट कमी होते.
असे ठरवतात कॅरेट : एखाद्या दागिन्यातील सोन्याच्या टक्केवारीवरून त्याचे कॅरेट ठरवले जाते. त्यासाठी संबंधित दागिन्याची तपासणी केल्यानंतर त्यातील सोन्याच्या टक्केवारीला ४.१६६ने भागले जाते. त्यानंतर जे उत्तर मिळते, तितके सोन्याचे कॅरेट मानले जाते. उदाहरणार्थ- एखाद्या दागिन्यात ७५ टक्के सोने आणि २५ टक्के इतर धातू आढळले, तर ते १८ कॅरेट सोने मानले जाते.
रवा, तुकडा
आणि लगडी
सोन्याच्या दागिन्यांव्यतिरिक्त वितळवलेल्या सोन्याचे तुकडे शुद्धता तपासणीसाठी आणले जातात. त्यांना कारागीर रवा, तुकडा आणि लगडी असे संबोधतात. त्यात ६ ग्रॅमहून कमी वजनाच्या तुकड्याला रवा, त्याहून अधिक जड असल्यास तुकडा आणि आकाराने लांब असलेल्या तुकड्याला लगडी असे म्हटले जाते.