‘ट्रामा’चा ड्रामा संपणार कधी ?

By Admin | Updated: November 21, 2014 00:54 IST2014-11-21T00:54:09+5:302014-11-21T00:54:09+5:30

अपघातांमध्ये जखमी झालेल्यांना व हृदयरोगाच्या गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळावे आणि त्यांचा जीव वाचवता यावा यासाठी मेडिकलमध्ये ट्रामा केअर सेंटरच्या बांधकामाला सुरुवात झाली.

When does Tramah's drama end? | ‘ट्रामा’चा ड्रामा संपणार कधी ?

‘ट्रामा’चा ड्रामा संपणार कधी ?

मनुष्यबळाची प्रतीक्षा : मेडिकलच्या ३०१ नव्या पदांना मंजुरीच नाही
सुमेध वाघमारे - नागपूर
अपघातांमध्ये जखमी झालेल्यांना व हृदयरोगाच्या गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळावे आणि त्यांचा जीव वाचवता यावा यासाठी मेडिकलमध्ये ट्रामा केअर सेंटरच्या बांधकामाला सुरुवात झाली. दिलेल्या मुदतीत बांधकामही पूर्ण झाले. परंतु ट्रामासाठी लागणाऱ्या ३०१ पदांच्या प्रस्तावाला अद्यापही मंजुरी मिळाली नाही. यामुळे ११.६० कोटी रुपये खर्चून तयार झालेले ‘अ’ दर्जाचे ट्राम केअर सेंटर शोभेची वास्तू ठरत आहे.
उपराजधानीत अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. १ जानेवारी २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत रस्ता अपघातात १ हजार ५१३ जण जखमी झाले असून यातील ३७३ जणांचा मृत्यू झाला आहे.
रस्ता अपघातातील जखमींसोबतच, हृदयरोग आजाराच्या गंभीर रुग्णांना ‘गोल्डन अवर’ मध्ये वैद्यकीय सुविधा मिळाल्या तर त्यांचा जीव वाचू शकतो. या आधारे मेडिकलने ६ हजार ८८० चौ.मी. जागेवर ट्रामा केअर सेंटरच्या बांधकामाची योजना तयार केली. पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेच्या १५० कोटी रुपयांमधून या सेंटरसाठी ११.६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. परंतु प्रस्तावित जागेवर बाबुंवनातील तब्बल १८५ झाडे अडसर ठरली.
तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी यात लक्ष घातल्याने १६ आॅगस्ट २०१२ रोजी बांधकाम सुरू झाले. १८ महिन्यांच्या मुदतीत म्हणजे येत्या मार्च महिन्यात बांधकाम पूर्ण झाले. नुकतेच अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी काही महत्त्वाचे बदल सांगितले. मात्र, हे कामही आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या सेंटरमध्ये तळमजल्यावर स्वागतकक्ष, चिकित्सा विभाग, शस्त्रक्रिया कक्ष, सिटी स्कॅन, एमआरआय, डिजिटल एक्स-रे मशीन व पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र वॉर्ड असणार आहे. पहिल्या मजल्यावर दोन मोठ्या शस्त्रक्रिया कक्ष, अतिदक्षता विभाग व बाह्यरुग्ण विभाग असेल. दुसऱ्या मजल्यावर अतिदक्षता विभागासह पुरुष आणि महिलांचा वॉर्ड असणार आहे.
..तरीही प्रस्तावाला मंजुरी नाही!
नागपूर : स्वागतकक्ष, प्रतीक्षालय, उपचार क्षेत्रात गंभीर आजाराच्या रुग्णांना त्वरित सेवा मिळण्यासाठी लाल, तांबडा आणि हिरव्या रंगाचे कक्ष, ब्लड बँक आदींची सोय असणार आहे. या अवाढव्य प्रकल्पाला यशस्वी करण्यासाठी २०१२ मध्ये ६०० नवीन पदांचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे (डीएमईआर) पाठविण्यात आला. परंतु संचालनालयाने यावर आक्षेप घेतला.
कमीतकमी मनुष्यबळाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर पाठविण्यात आलेल्या ४०० नव्या पदालाही नकार मिळाला. दरम्यानच्या काळात डीएमईआरकडून ट्रामा केअर सेंटरची पाहणी झाली. त्यांनी ३०१ पदांचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली. त्यानुसार हा नवा प्रस्ताव ७ फेब्रुवारी २०१४ रोजी डीएमईआरकडे पाठविण्यात आला. तेथून हा प्रस्ताव १८ फेब्रुवारी २०१४ रोजी मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला. मात्र,नऊ महिन्यांच्या कालावधीनंतरही मंजुरी मिळाली नाही. (प्रतिनिधी)

Web Title: When does Tramah's drama end?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.