‘अंबाबाई’साठी निधी कधी ?

By Admin | Updated: November 12, 2014 23:59 IST2014-11-12T23:53:18+5:302014-11-12T23:59:45+5:30

नव्या सरकारकडून अपेक्षा : तीन वर्षांनंतरही मंदिरासाठी दहा कोटींचा निधी नाही

When did you fund for 'Ambabai'? | ‘अंबाबाई’साठी निधी कधी ?

‘अंबाबाई’साठी निधी कधी ?

इंदुमती गणेश - कोल्हापूर -काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेच्या काळात कोल्हापूरच्या अंबाबाईचा आणि कोल्हापूरचा पर्यटनस्थळाचा विकास आराखड्याची अवस्था ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी’ अशी झाली. राज्य शासनाने मंदिरासाठी मंजूर केलेला दहा कोटींचा निधी तीन वर्षांनंतरही मिळालेला नाही. पुढच्यावर्षी मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेला तीनशे वर्षे पूर्ण होत आहेत, अशा परिस्थितीत आता केंद्र आणि राज्यात असलेल्या भाजप आश्वासनांनुसार अंबाबाई मंदिराचा विकास करेल का? याकडे कोल्हापूरकरांच्या नजरा लागल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंबाबाई मंदिराच्या विकासाचे आश्वासन दिले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे या सगळ््यांनी पक्षाला बहुमत मिळावे म्हणून अंबाबाईला साकडे घातले होते. ते साकडे पूर्णत्वास जाऊन राज्यात आणि केंद्रातही भाजपची सत्ता आहे. गेल्या पाच वर्षांपासून अंबाबाई मंदिराच्या विकासाला लागलेला अनास्थेचा दुर्दैवी फेरा संपवून या नव्या सरकारने तरी मंदिराच्या विकासासाठी ठोस पाऊल उचलावे, या आशेने त्यांच्याकडे पाहिले जात आगे.
कोल्हापूरचा पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा यासाठी गेल्या पाच वर्षांत आराखड्यांवर आराखडे बनविण्यात आले आहेत. त्यात अंबाबाई मंदिरासाठी स्वतंत्र १९० कोटींचा त्याचेच पोटआराखडे म्हणून ५० कोटी आणि दहा कोटींचा विकास आराखडा तयार आहे. दुर्दैवाने मंदिराचा विकास फक्त कागदावरच झाला. पालिकेने वारंवार पाठपुरावा करूनही राज्य शासनाने मंदिर विकासासाठी मंजूर झालेला निधी वर्ग केला नाही. त्यामुळे देवीच विकासापासून वंचित राहिली.
प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या आदिशक्ती स्वरूप करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्ती प्रतिष्ठापनेला सप्टेंबर २०१५ मध्ये ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. या त्रिशताब्दी वर्षात तरी कोल्हापूरचे धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून विकास होणे गरजेचे आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी अंबाबाईच्या मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेच्या वर्षात देवीसाठी सोन्याची पालखी बनविण्याचा संकल्प केला आहे. मात्र, त्याहीपेक्षा तिच्या दर्शनाची आस घेऊन आलेल्या भाविकांना सेवा मिळणे अधिक महत्त्वाचे आहे.
यंदा नवरात्रात एकूणच भाविकांची संख्या दोन लाखांनी वाढली आहे. नवरात्रौत्सवाच्या दहा दिवसांत तब्बल १५ लाख भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. वर्षाकाठी किमान २० ते २५ लाख भाविक व पर्यटक कोल्हापुरात येतात. मात्र, त्यांना सोयी-सुविधा मिळत नाहीत.

देवस्थान समितीचा कोरम व्हावा पूर्ण
मंदिराचे व्यवस्थापन बघणाऱ्या देवस्थान समितीचा कोरम पूर्ण झाल्याशिवाय अंबाबाई मंदिर विकासाला गती मिळणार नाही. समितीवर राष्ट्रवादीचे तीन आणि काँग्रेसचे दोन असे पाच सदस्य आहेत. आणखी एक सदस्य आणि अध्यक्षांची नियुक्ती झाली की, समितीचा कोरम पूर्ण होतो. आता सर्वाधिकार भाजपकडे असणार आहेत. सचिवपदी शुभांगी साठे यांची नियुक्ती होऊनही तांत्रिक अडचणीमुळे हा पदभार निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे आहे.

निधीसाठी पाठपुरावा
अंबाबाई मंदिराच्या विकासासाठी शासनाने मंजूर केलेला दहा कोटींचा निधी अकार्यक्षम नेतृत्व आणि पाठपुराव्यांअभावी तीन वर्षांनंतरही कोल्हापूर महापालिकेकडे वर्ग झालेला नाही. नवीन सरकार स्थिरस्थावर झाले की, कोल्हापुरातील आमदार, खासदारांनी हा निधी तातडीने वर्ग व्हावा यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

Web Title: When did you fund for 'Ambabai'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.