शिस्तीची डरकाळी फोडणार कधी?
By Admin | Updated: August 1, 2016 01:57 IST2016-08-01T01:57:07+5:302016-08-01T01:57:07+5:30
कोणत्याही यंत्रणेचा कारभार व शिस्त त्याच्या प्रमुखावर अवलंबून असते.

शिस्तीची डरकाळी फोडणार कधी?
पिंपरी : कोणत्याही यंत्रणेचा कारभार व शिस्त त्याच्या प्रमुखावर अवलंबून असते. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेत जसे आयुक्त तशी कर्मचाऱ्यांची वागणूक बदलत असल्याचे चित्र महापालिकेत आहे. तीन महिन्यांपूर्वीच नव्याने रुजू झालेल्या आयुक्तांबाबत ही स्थिती झाली आहे. रुजू झाल्यानंतर सुरुवातीला शिस्तीचा बडगा म्हणून काही आदेश दिले. मात्र, पुन्हा पहिले पाढे पंचावन असे चित्र पाहायला मिळत आहे.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी प्रशासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता आणली होती. शिवाय कर्मचाऱ्यांनाही शिस्त लावली होती. त्यांच्या शिस्तीचा धसकाच कर्मचाऱ्यांनी घेतला होता. गणवेश, वेळेवर उपस्थिती, कामात चोख आदींची अंमलबजावणी होत होती. त्यानंतर आलेल्या राजीव जाधव यांच्या काळात शिस्तीची घडी विस्कटली. महापालिका म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी स्थिती झाली होती. गणवेश नाही, की वेळेचे बंधन नाही, असे चित्र होते. याचा कामकाजावर मोठा परिणाम झाला. जाधव यांच्या बदलीनंतर दिनेश वाघमारे यांनी ३ मे २०१६ ला पदभार स्वीकारला. आयुक्तांकडून प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणून बदल केले जातील, अशी अपेक्षा होती. आयुक्त रुजू झाल्याबरोबर काही आदेश दिले. मात्र ते तेवढ्यापुरतेच मर्यादित राहिल्याचे दिसते. (प्रतिनिधी)
ओळखपत्र सर्वांना बंधनकारक असतानाही ठरावीक कर्मचारीच ते बाळगतात. इतर कर्मचारी ओळखपत्राविनाच वावरत असल्याचे दिसते. याचा प्रत्यय चिंचवडगावातील चापेकर बंधूंच्या समूहशिल्प अनावरण कार्यक्रमात आला. चापेकर चौकात मंडप उभारण्यात आला होता. कार्यक्रमास अनेकजण उपस्थित होते. यामध्ये महापालिका कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. मात्र, येथे कर्मचारी साध्या वेशात होते. शिवाय ओळखपत्राचाही पत्ता नव्हता. त्यामुळे ते राजकीय कार्यकर्ते आहेत, की पालिकेचे कर्मचारी, याबाबत काही स्पष्ट होत नव्हते.
अनेकजण राजकीय पुढारी, कार्यकर्त्यांप्रमाणे वावरत होते. यातून एकप्रकारे आयुक्तांच्या आदेशालाच बगल दिली जात असल्याचे दिसून येते. एखाद्या कामाचे निमित्त करुन कार्यालयाबाहेर पडणारे कर्मचारी तासन्तास पुन्हा कार्यालयाकडे फिरकतच नाहीत. निवांतपणे चौकात अथवा रस्त्यांवर गप्पा मारत असतात. अथवा खासगी कामे उरकून येतात. यामुळे कामाचा खोळंबा होत असल्याचे प्रकार घडत आहेत.
>नव्याचे नऊ दिवस संपले; आता आढावा घ्या : अजित पवार
पिंपरी : कामाचा दर्जा ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, आम्ही पारदर्शक कारभाराचे समर्थक आहोत. नव्याचे नऊ दिवस संपले. आता आढावा घ्या. कामाचा दर्जा कायम ठेवा. मूर्ती खरेदीत एकाच ठेकेदाराने तीन निविदा भरल्या असतील, तर काळ्या यादीत टाका, अशा सूचना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या. थेरगाव येथील रुग्णालयाच्या पायाभरणी समारंभात खासदार श्रीरंग बारणे यांनी विकासकामे करीत असताना कामाचा दर्जा राखला जावा, तालेरा रुग्णालयाचे काम निकृष्ट दर्जाचे होते. जिजामाता रुग्णालयाचे काम रखडले आहे. वेळेत आणि दर्जेदार काम करणार नाही, अशा ठेकेदारांवर प्रशासनाने कडक कारवाई करायला हवी. चुकीची कामे रोखायला हवीत.’’ हाच धागा पकडून अजित पवार, आयुक्त दिनेश वाघमारे यांना उद्देशून म्हणाले, ‘‘मूर्ती खरेदीवरून पेपरबाजी झाली. ई-टेंडरिंग प्रक्रियेद्वारे खरेदी झाली. कागदपत्रे पाहणे ही जबाबदारी प्रशासनाची आहे. साप सोडून भुई धोपटायचे काम सोडून द्यायला हवे. ज्या एकाच ठेकेदाराने तीन निविदा भरल्या असतील, तर त्याला काळ्या यादीत टाकून द्या. आम्ही पारदर्शक कारभाराचे समर्थक आहोत. नव्याचे नऊ दिवस संपलेत. आढावा घ्या. चुकीची कामे थोपवा.’’
सांगायला लावू अन् हशा...
‘येथील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना एकत्रित करून बैठकीचे आयोजन करा, न्यायालयासंदर्भातील काही प्रश्न असतील, तर संबंधितांचे म्हणने ऐकून घेऊन ते ज्यांचे ऐकतात. त्यांना सांगायला लावू. त्यांना सांगायला लावून म्हणजे काही लोक लगेच वेगळा अर्थ घेतील. लगेच सुरू होईल, अजित पवार म्हणताहेत. प्रश्न समन्वयाने आणि चर्चेने सोडवावेत, दादागिरी, दहशतीने नाही, असे पवार यांनी म्हणताच हास्य लाट उसळली.