लोकप्रतिनिधी गप्प का?
By Admin | Updated: July 30, 2014 01:25 IST2014-07-30T01:25:53+5:302014-07-30T01:25:53+5:30
झामरेने लुटले, जोशीने ओरबरडले, आता वासनकर लुटत असताना नागपुरातील लोकप्रतिनिधी गप्प का, कुणीच या ठगबाजांविरोधात आवाज का उचलत नाही, एकही राजकीय पक्ष रस्त्यावर येऊन

लोकप्रतिनिधी गप्प का?
झामरे, जोशी, वासनकर लुटताहेत : गुंतवणूकदारांचा वाली नाही
नागपूर : झामरेने लुटले, जोशीने ओरबरडले, आता वासनकर लुटत असताना नागपुरातील लोकप्रतिनिधी गप्प का, कुणीच या ठगबाजांविरोधात आवाज का उचलत नाही, एकही राजकीय पक्ष रस्त्यावर येऊन आंदोलन का करीत नाहीत, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या अन् आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही प्रतिक्रिया देणारे नेते नागपुरातील या लुबाडणुकीवर का बोलत नाहीत, असा सवाल नागपूरकर जनतेने उपस्थित केला आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी तब्बल अडीच महिन्यानंतर वासनकरला अटक केली. जवळपास ३ हजार गुंतवणूकदारांपैकी केवळ २० जणांनी तक्रार नोंदविली आहे. नाशिक येथील केबीसीच्या १० हजार कोटींच्या घोटाळ्यानंतर गुंतवणूकदारांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. राजकीय नेत्यांनीही त्यांना साथ दिली. तेसुद्धा आंदोलकर्त्यांसोबत रस्त्यावर उतरले. या घोटाळ्याचा सवाल मुंबईतील खासदाराने लोकसभेत विचारला. पण नागपुरातील कोट्यवधींची रक्कम लुटून नेणाऱ्या फसव्या कंपन्यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाहीत. त्यामुळेच लोकांचा नेत्यांवरील विश्वास उडाला आहे. फसव्या कंपन्यांच्या संचालकांशी बड्या नेत्यांचे हितसंबंध तर नाही ना? पक्षाच्या कार्यक्रमांसाठी, निवडणुकांसाठी यांना हे ठगबाज ‘फंड’ तर देत नाहीत ना, किंवा या ठगबाजांना संरक्षण देण्याची हमी तर नेत्यांनी घेतली नाही ना, अशा एक ना अनेक प्रश्नांनी नागरिकांच्या मनात घर केले आहे.
बोललो तर ‘साहेब’ काय म्हणतील ?
पीडित गुंतवणूकदारांच्या विरोधात बोललो तर ‘साहेब’ काय म्हणतील, अशी भीती सर्वच पक्षांच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहे. नागपूरकांना झामरे, जोशी, वासनकर लुबाडतो तेव्हा लोकप्रतिनिधी गप्प बसतात. त्यांचा आदर्श घेऊन कार्यकर्तेही गप्प राहणेच पसंत करतात. नागपुरात आतापर्यंत झालेल्या आर्थिक घोटाळ्यात पीडित गुंतवणूकदारांच्या बाजूने कुणी नेता वा कार्यकर्ता रस्त्यावर आला नाही. नेत्यांनी पुढे येऊन संघर्ष करावा, अशी भावना पीडित गुंतवणूकदारांमध्ये आहे.
सामाजिक संघटनाची चुप्पी
इराक-इराण प्रश्नावर प्रतिक्रिया देणाऱ्या संघटनांनी आर्थिक घोटाळ्यावर चुप्पी साधली आहे. कोट्यवधींच्या आर्थिक घोटाळ्यात कोणत्याही संघटनांनी प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा पीडितांच्या मदतीसाठी त्यांनी हात पुढे केलेला नाही. संघटनांची प्रतिक्रिया केवळ प्रसिद्धीसाठी असते. राजकीय नेत्यांसारखेच त्यांचेही ठगबाजांशी हितसंबंध असल्याचा गुंतवणूकदारांचा आरोप आहे.
लोकमतचे आवाहन
सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्या आणि वेगवेगळे आमिष दाखवून आर्थिक लूट करणारे प्रमोद अग्रवाल, प्रवीण व वर्षा झामरे, हरिभाऊ मंचलवार, समीर व पल्लवी जोशी, प्रशांत वासनकर, राजेश जोशी यांच्यासारखेच अनेक ठगबाज शहरातील गल्लीबोळात अजूनही फसवणुकीचा व्यवसाय करीतच आहेत. जनमाणसाचे डोळे उघडण्यासाठी लोकमतने मोहीम सुरू केली आहे. दामदुपटीचे आमिष दाखविणाऱ्या ठगबाजांच्या विरोधात नागरिकांनी पुराव्यांसह ९९२२९२८१०९, ९८५०९५७७८७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
दोन वर्षात दामदुप्पट शक्य नाही
राष्ट्रीयकृत बँका नऊ वर्षात दामदुप्पट देतात. दोन वर्षांत दामदुप्पट देणाऱ्या कंपन्यांचे गणित समजण्यापलीकडे आहे. त्यांना लोकांचे पैसे द्यायचेच नसतात. ठेवीदारांचा ओघ बंद झाल्यानंतर त्या कंपन्या लोकांना व्याज सोडा साधी मुद्दल देणेही टाळतात. वार्षिक ६० किंवा ७० टक्के व्याजदराच्या योजनांपासून लोकांनी दूर राहावे, असे अर्थतज्ज्ञांचे आवाहन आहे.